
महापालिकेच्या चिटणीस विभागाचे नाव बदलून आता सचिव विभाग केले जाणार आहे. गेल्या 14 वर्षांपूर्वी असलेली ही मागणी अद्याप प्रलंबित आहे. याबाबत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी आज हरकतीचा मुद्दा मांडून याकडे स्थायी समितीचे लक्ष वेधले. यावर आगामी समितीच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दिले.
मुंबई महापालिकेचा चिटणीस विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाचे चिटणीस हे पदनाम पारसी भाषेत आहे. चिटणीस हे पारसी भाषेत बोलले जाते. त्यामुळे चिटणीसऐवजी सचिव असे करावे अशी मागणी 14 वर्षांपूर्वी नगरसेवकांनी केली होती. सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी पालिका प्रशासनाच्या या उदासीनतेबाबत हरकतीचा मुद्दा मांडून लक्ष वेधले.
नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी हरकतीच्या मुद्दय़ाला पाठिंबा देत तत्कालीन नगरसेवक गोपाळ शेट्टी यांची पदनाम बदलण्याची मागणी केली होती, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. तर चिटणीस हे पदनाम बदलून सचिव असे मराठीत तत्काळ करण्याबाबत आजच्या स्थायी समितीतच निर्णय घ्यावा अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी लावून धरली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाने याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा असे निर्देश दिले. दरम्यान, येत्या स्थायी समिती बैठकीपूर्वी यावर निर्णय घेतला जाईल, असे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी स्पष्ट केले.स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाने याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले. दरम्यान, येत्या स्थायी समिती बैठकीपूर्वी यावर निर्णय घेतला जाईल, असे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी स्पष्ट केले.





























































