पालिकेची खबरदारी! 10 जानेवारीपासून ‘प्रिव्हेंटिव्ह डोस’, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, सहव्याधी असलेल्या ज्येष्ठांना बूस्टर डोस देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vaccine

मुंबईत कोरोना आणि ओमायक्रोन रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असतानाच दोन्ही डोस घेतलेल्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यातच वाढत्या रुग्णसंख्येने तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेने आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, सहव्याधी असणाऱ्यांसह ज्येष्ठांना ‘प्रिव्हेंटिव्ह’ बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. 10 जानेवारीपासून हा डोस दिला जाणार आहे. यामध्ये सुमारे 13 लाख लाभार्थी असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबईत कोरोना आणि झपाटय़ाने पसरणारा ओमायक्रोन वाढू लागल्याने पालिकेच्या माध्यमातून 21 डिसेंबरनंतर कोरोनाबाधित आढळणाऱ्या सर्व रुग्णांची जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी करण्यात येत आहे. यामध्ये पालिकेच्या चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात आणि पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या माध्यमातून जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी केली जात आहे. यामध्ये शुक्रवारी आलेल्या ओमायक्रोनबाधित आढळलेल्या 141 रुग्णांमध्ये दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण तब्बल 93 इतके होते. त्यामुळे कोरोना किंवा ओमायक्रोनने उग्र रूप धारण केल्यास खबरदारी म्हणून ‘प्रिव्हेंटिव्ह डोस’ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे काकाणी यांनी सांगितले.

अशी आहे लाभार्थ्यांची आकडेवारी

मुंबईत सुमारे 1 लाख 88 हजार आरोग्य कर्मचारी आहेत. तर 1 लाख 50 हजार फ्रंटलाइन वर्कर्स आहेत. शिवाय 10 लाखांवर ज्येष्ठ, सहव्याधीग्रस्त आहेत.

87 टक्क्यांवर लसीकरण पूर्ण

पालिकेच्या माध्यमातून 16 जानेवारीला लसीकरण सुरू झाल्यानंतर आतापर्यंत एकूण 1 कोटी 79 लाख 68 हजार 492 डोस देण्यात आले आहेत. यामध्ये 18 वर्षांवरील 92 लाखांवर पात्र लाभार्थ्यांचा पहिला डोस पूर्ण झाला असून 87 टक्के जणांचा दुसरा डोसही पूर्ण झाला आहे. जानेवारीअखेरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.