शुद्ध पाणीपुरवठ्यामुळे मुंबईत पालिकेने जलजन्य आजार रोखले! सहा वर्षांच्या अभ्यासाचा निष्कर्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात सर्वाधिक शुद्ध पाणीपुरवठा करीत असल्याचा लौकीक असलेल्या मुंबई महानगरपालिकेने शुद्ध पाणीपुरवठा केल्यामुळे पाण्यापासून होणाऱ्य़ा आजारांना मोठ्या प्रमाणात रोखण्यात यश मिळवले आहे. यामध्ये गेल्या सहा वर्षांपासून जलजन्य आजारांची रुग्णसंख्या घटत असून गेल्या 11 महिन्यांच्या कालावधीतही हिपेटायटीस रुग्णसंख्येत 83.60 टक्के तर गॅस्ट्रोबाधितांच्या संख्येत तब्बल 68.04 टक्क्यांची घट झाल्याचे समोर आले आहे.

पाण्यापासून होणाऱ्य़ा आजारांबाबत पालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. यामध्ये सातत्याने हात धुणे, उघड्यावरचे अन्न न खाणे, कटाक्षाने शुद्ध पाणी पिण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन दिले जात आहे. याला नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे गेल्यावर्षी म्हणजेच जानेवारी ते नोव्हेंबर 2019 या दरम्यान 1 हजार 494 इतकी असणारी हिपेटायटीस ‘ए’ व ‘ई’ रुग्णांची संख्या यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर 2020 या 11 महिन्यांच्या कालावधीत 245 इतकी झाली आहे. या आकडेवारीनुसार हिपेटायटीस रुग्णांच्या संख्येत तब्बल 83.60 टक्के घट नोंदवण्यात आली आहे. हिपेटायटीस ‘ए’ व ‘ई’ रुग्णसंख्या जानेवारी ते नोव्हेंबर 2015 या दरम्यान 1 हजार 75 एवढी होती. याच 11 महिन्यांच्या कालावधीसाठी सदर रुगणसंख्या 2016 मध्ये 1 हजार 425, वर्ष 2017 मध्ये 1 हजार 105, वर्ष 2018 मध्ये 1 हजार 74 इतकी नोंदविण्यात आली होती.  

अशी होतेय घट

गॅस्ट्रो रुग्णांच्या संख्येत जानेवारी ते नोव्हेंबर 2019 या 11 महिन्यांच्या कालावधीत 7 हजार 247 रुग्ण आढळून आले होते. तर जानेवारी ते नोव्हेंबर 2020 या दरम्यान 2 हजार 316 रुग्ण आढळून आले. या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत यावषी तब्ब्ल 68.04 टक्क्यांची घट झाली आहे. गॅस्ट्रो रुग्णसंख्या ही जानेवारी ते नोव्हेंबर 2015 या दरम्यान 10 हजार 257 होती. याच 11 महिन्यांच्या कालावधीत 2016 मध्ये रुग्णसंख्या 9 हजार 462, वर्ष 2017 मध्ये 7 हजार 911 आणि वर्ष 2018 मध्ये 7 हजार 315 इतकी नोंदवण्यात आली.

हिपेटायटीस ‘ए’ व ‘ई’ आणि गॅस्ट्रो या दोन्ही जलजन्य आजारांच्या उपलब्ध आकडेवारीचा एकत्रित विचार केल्यास जानेवारी ते नोव्हेंबर 2019 दरम्यान 8 हजार 741 रुग्ण आढळून आले होते. तर याच कालावधीत यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर 2020 दरम्यान 2 हजार 561 रुग्ण आढळून आले आहेत. या आकडेवारीवरून गेल्या वर्षीच्या तुलनेत जलजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत तब्बल 70.70 टक्क्यांची घट झाली आहे.