
कोरोनाला रोखण्यासाठी अहोरात्र काम करणार्या पालिकेने पावसाळी आजारांनाही रोखण्यात यश मिळवले आहे. यामध्ये सप्टेंबरअखेर मलेरिया रुग्णांची संख्या 661 वरून 160 वर आली असून लेप्टो रुग्णसंख्या 54 वरून 15 वर आली आहे. सद्यस्थितीत मुंबईत डेंग्यूचा फक्त 1 रुग्ण असून ‘एच1एन1’चा एकही रुग्ण नाही. पालिकेच्या प्रमुख कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी ही माहिती दिली.
मुंबईत सप्टेंबरमध्ये कोरोनाप्रमाणेच नियंत्रणात आलेल्या पावसाळी आजारांनी पुन्हा डोके वर काढल्याने पालिकेसह मुंबईकरांचे टेन्शन वाढले होते. 15 सप्टेंबरला 317 असणारी मलेरिया रुग्णांची संख्या 27 सप्टेंबर रोजी 661 वर पोहोचली होती. म्हणजेच मलेरियाचे रुग्ण दुपटीने वाढले. तर लेप्टोस्पायरोसिसमुळे एक मृत्यूही झाला होता. त्यामुळे पालिकेसमोर पुन्हा एकदा पावसाळी आजार रोखण्याचे आव्हान निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पालिकेने प्रमुख रुग्णालयांसह पेरीफेरल हॉस्पिटलमध्ये नॉनकोविड आजारांसाठी आरोग्यसुविधा वाढवल्याने या आजारांवर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आले आहे. यामध्ये पालिकेचा आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन सुरू असणारी तपासणी, कीटकनाशक विभागाकडून डास प्रतिबंधक फवारणी, डास उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्याची मोहीम, स्वच्छता उपक्रम, रहिवाशांमध्ये केलेली जनजागृती यामुळे आजार आटोक्यात आले आहेत. दरम्यान, आजार आटोक्यात आले असले तरी मुंबईकरांनी कोणत्याही आजारांकडे दुर्लक्ष न करता कोणतीही शंका असल्यास पालिकेच्या 022 241140000 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहनही पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
अशी आहे सद्यस्थिती
आजार 27 सप्टेंबर 11 ऑक्टोबर
मलेरिया 661 160
लेप्टो 54 15
डेंग्यू 14 1
गॅस्ट्रो 91 31
हिपेटायटिस 15 3
एच1एन1 1 0
गेल्यावर्षीच्या तुलनेतही मोठी घट
ऑक्टोबर 2019 च्या मध्यावर मलेरिया रुग्णांची संख्या 536 लेप्टो 30, डेंग्यू 242, गॅस्ट्रो 386, हिपेटायटिस 70 आणि एच1एन1चे 4 रुग्ण होते. मात्र यावर्षी मलेरिया, लेप्टो, डेंग्यू, गॅस्ट्रो, हिपेटायटीस आणि एच1एन1 या सर्वच आजारांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी नोंदवली गेली आहे.

























































