
• अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दोन दिवस पाहणी दौरा करुन घेतला आढावा
• जम्बो कोविड सेंटर्ससह सर्व कोरोना काळजी केंद्रांमधील रुग्णशय्याही सुसज्ज
• प्रत्येक रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयासह जम्बो सेंटर्समध्येही लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग
• लहान मुलांची नागरिकांनी विशेष काळजी घ्यावीः महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन
मुंबई महानगरामध्ये कोविड-१९ विषाणू संसर्गाची पहिली व दुसरी लाट योग्यपणे थोपवून मुंबईकरांना सर्वोत्तम आरोग्य सुविधा देणाऱया बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोविड-१९ च्या संभाव्य तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी दोन दिवस क्षेत्रीय पाहणी दौरे करुन या तयारीचा संपूर्ण आढावा घेतला आहे. विविध रुग्णालये व भव्य कोविड उपचार केंद्र (जम्बो सेंटर) तसेच कोरोना काळजी केंद्रे (सीसीसी) यातील रुग्णशय्या सुसज्ज करुन उपचारांसाठी उपलब्ध आहेत. त्यासमवेत लहान मुलांसाठी देखील स्वतंत्र असे कक्ष सर्व रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांसह जम्बो सेंटर्समध्ये कार्यान्वित करण्यात येत असून मुलांच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, यासाठी विशेष दक्ष राहण्याच्या सूचना काकाणी यांनी आरोग्य प्रशासनाला दिल्या आहेत.
महानगरपालिका प्रशासन पूर्वतयारीनिशी सुसज्ज होत असली तरी कोविड संसर्गाची तिसरी लाट येवू नये, यासाठी मुंबईकरांनी कोविड प्रतिबंधक सर्व सुचनांचे व मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे, विशेषतः लहान मुलांची अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
कोविड विषाणू संसर्गाच्या संभाव्य तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने, विशेषतः आरोग्य यंत्रणेने कामकाजाचा फेरआढावा घेवून पूर्वतयारी सुरू केली असून सदर कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्याची प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा घेण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांनी काल (दिनांक २२ जून २०२१) आणि आज (दिनांक २३ जून २०२१) असे दोन दिवस महानगरपालिकेची विविध रुग्णालये तसेच समर्पित कोविड आरोग्य केंद्र (जम्बो कोविड सेंटर्स) ची देखील पाहणी केली. या तयारीबद्दल समाधान व्यक्त करतानाच उर्वरित कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करुन सतर्क राहण्याचे निर्देशही आरोग्य यंत्रणेला त्यांनी दिले.
या आढाव्याबाबत माहिती देताना श्री. काकाणी म्हणाले की, महानगरपालिकेची विविध रुग्णालये, जम्बो कोविड सेंटर्स, कोरोना काळजी केंद्र 1 (सीसीसी 1), कोरोना काळजी केंद्र 2 (सीसीसी 2) यामध्ये कोविड बाधितांसाठी रुग्णशय्या सुसज्ज असून उपचारार्थ उपलब्ध आहेत. यामध्ये जवळपास 2 हजार जीवरक्षक प्रणाली (व्हेंटिलेटर) रुग्णशय्या आहेत. वेगवेगळ्या जम्बो कोविड सेंटर्समध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मिळून सुमारे 7 हजार 307 रुग्णशय्यांची क्षमता विकसित करण्यात आली. त्यावर जवळपास 77 हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले. आता जम्बो कोविड सेंटर्समध्ये दुसऱया टप्प्यामध्ये 8 हजार 350 नवीन रुग्णशय्या क्षमता विकसित होण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यात कांजूरमार्ग येथे 2 हजार 200, मालाडमध्ये 2 हजार 200, शीव येथे 1 हजार 200, वरळी रेसकोर्स येथे 450, भायखळा येथील रिचर्डसन एण्ड क्रूडासमध्ये 700 गोरेगांव नेस्को 1 हजार 500, वरळी एनएससीआय येथे 100 याप्रमाणे रुग्णशय्या क्षमता वाढवण्यात आली आहे. म्हणजेच जम्बो सेंटर्समधील रुग्णशय्या क्षमता एकूण 15 हजार 657 इतकी होत आहे. यातील ७० टक्के रुग्णशय्या या वाहिनीद्वारे प्राणवायू पुरवठा असणाऱया आहेत. प्रत्येक जम्बो कोविड सेंटरमध्ये द्रवरुप वैद्यकीय प्राणवायू साठवण टाक्या उपलब्ध आहेत. प्राणवायू सिलेंडर्स बॅकअपसह विविध रुग्णालयांमध्ये वातावरणातील हवेतून वैद्यकीय प्राणवायू उत्पादीत करणारी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यामुळे प्राणवायूची अडचण नाही, असे काकाणी यांनी नमूद केले.
पुढे ते म्हणाले की, तिसऱया लाटेचा सामना करताना लहान मुलांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना लक्षात घेता, महानगरपालिकेच्या प्रत्येक रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयासह जम्बो कोविड सेंटर्समध्येही लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात येत आहे. कोविड-१९ संसर्गाच्या अनुषंगाने उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आतापर्यंत तीन वेळा बालरोग तज्ज्ञांची कार्यशाळा घेण्यात आली आहे. मुलांच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, याकडे विशेष लक्ष देत आहोत. तसेच, कोविड बाधित गरोदर मातांसाठी देखील स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले असून त्यांची विशेष व्यवस्था केली जाणार आहे, असेही श्री. काकाणी यांनी यावेळी नमूद केले. सद्यस्थितीत कोविडच्या दुसरी लाट ओसरली असली आणि कोविड प्रतिबंधक लसीकरण वेगाने सुरु असले तरी, सर्व मुंबईकर नागरिकांनी प्रतिबंधक नियमांचे योग्यरित्या पालन केले पाहिजे. लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबाची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी प्रशासनाच्यावतीने केले आहे.
काकाणी यांनी मालाडमध्ये मुंबई विकास प्राधिकरणामार्फत नव्याने उभारण्यात येत असलेले कोविड केअर सेंटर, गोरेगाव जम्बो कोविड सेंटर, बी. के. सी. जम्बो कोविड सेंटर, दहिसर जम्बो कोविड सेंटर, कांजूरमार्ग कोविड सेंटर येथे भेट दिली. यावेळी उपायुक्त (परिमंडळ ७) विश्वास शंकरवार, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) देवीदास क्षीरसागर, उपआयुक्त (भूसंपादन) अनिल वानखेडे, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, अधिष्ठाता डॉ. प्रदीप आंग्रे, गोरेगांव नेस्को जम्बो कोविड सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्रादे, बीकेसी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश ढेरे यांच्यासह सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर, अलका ससाणे, विभास आचरेकर, गजानन बेल्लाळे, सिडकोचे अधीक्षक रमेश गिरी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.






























































