
सामना ऑनलाईन । मुंबई
शाळांमध्ये आग लागण्याच्या दुर्घटना होऊ नये म्हणून सर्व खासगी शाळांना फायर ऑडिट करण्याच्या सूचना अग्निशमन दलाने दिल्या आहेत. मात्र आतापर्यंत 1103 खासगी शाळांपैकी केवळ 282 शाळांनीच फायर ऑडिट केले असल्याची माहिती अधिकाऱयांनी आज शिक्षण समितीमध्ये दिली. त्यामुळे खासगी शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची अग्निसुरक्षा ही सध्यातरी रामभरोसे आहे.
आगीच्या दुर्घटनांमध्ये वाढ होत असून भविष्यात शाळेत अशी दुर्घटना होऊन निष्पाप विद्यार्थ्यांचे बळी जाऊ नयेत म्हणून सर्व शाळांचे फायर ऑडिट करावे आणि योग्य त्या उपाययोजना कराव्या अशी मागणी शिवसेनेसह सर्वपक्षीय सदस्यांनी वारंवार केली होती. त्यानुसार पालिकेच्या शाळांमध्ये फायर ऑडिट सुरू करण्यात आले असून ज्या शाळांमध्ये अग्निसुरक्षेच्या दृष्टीने बदल करणे आवश्यक होते अशा शाळांच्या इमारतीत बदल करण्यात आले असल्याची माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त मिलीन सावंत यांनी शिक्षण समितीमध्ये दिली.
पालिकेच्या शाळांच्या इमारतींचे फायर ऑडिट हे अग्निशमन दलामार्फत केले जात आहे, तर खासगी शाळांनी मात्र बाहेरून हे फायर ऑडिट करून घ्यायचे आहे. नोव्हेंबर महिन्यात खासगी शाळांना तशा सूचना दिल्या होत्या. या शाळांनी अग्निशमन दलाकडे अर्ज केल्यास त्याचे शुल्क आकारून हे ऑडिट केले जाते, मात्र आतापर्यंत केवळ 282 शाळांनीच फायर ऑडिट केले असल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली. उर्वरित शाळांना नियमानुसार नोटीस बजावण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
- खासगी शाळांच्या इमारती : 1103
- फायर ऑडिट केले : 282
- पालिका शाळांच्या इमारती : 442
- फायर ऑडिट झाले : 319
























































