पालिकेच्या शाळांची दुरुस्ती रखडवणाऱ्या कंत्राटदारांना 32 लाखांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या शाळांच्या दुरुस्तीचे कंत्राट देऊनही काम रखडवणाऱया कंत्रादारांना पालिकेने चांगलाच दणका देताना 32 लाख 46 हजारांचा दंड ठोठावला आहे. कंत्राटदारांनी 32पैकी 12 शाळांचीच कामे केल्याने संबंधित कंत्राटदारांवर कारवाई केली असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. या कंत्राटदारांनी 2018मध्ये या शाळांचे काम मिळूनही कार्यवाही केली नसल्याचेही प्रशासनने सांगितले.

पालिकेच्या मुंबईत विविध भागांत एक हजाराहून अधिक शाळा इमारती आहेत. दरवर्षी आवश्यकतेनुसार या इमारतींची दुरुस्ती केली जाते. प्रशासनाने 2017 ते 2019 या कालावधीत विभागनिहाय 32 शाळांच्या इमारतींती दुरुस्तीची कामे दिली आहेत. या दुरुस्ती कामासाठी तब्बल 497 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे शाळांना फटका बसलाच, शिवाय शाळा दुरुस्तीदेखील रखडली आहे. कोरोनामुळे सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये कंत्राटदारांना बांधकाम साहित्य मिळण्यास अडथळे येत होते. त्यामुळे काही शाळांची कामे ठप्प पडली, असे कंत्राटदारांचे म्हणणे होते.

अशी होती अपेक्षित कामे

कंत्राट कालावधीनुसार 32 शाळांच्या कामांपैकी 2020मध्ये 12 कामे, सन 2021मध्ये 15, सन 2022मध्ये 4 व सन 2023मध्ये एका शाळेचे काम पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र नियोजित कालावधीनुसार 12 कामे वगळता इतर कामे पूर्ण झालेली नाहीत.

आतापर्यंत शाळा        दुरुस्तीवर झालेला खर्च
कुर्ला- एल – 8              68.48 कोटी
घाटकोपर-एन                 9.19 कोटी
मानखुर्द-एम/पूर्व 3         21.43 कोटी
चेंबूर-एम/पश्चिम 2          17.74 कोटी
वरळी-जी/दक्षिण 1          2.13 कोटी
माटुंगा-एफ/उत्तर 2        31.04 कोटी
दादर-जी/उत्तर 1            1.94 कोटी
अंधेरी-के/पूर्व 2            10.44 कोटी
वांद्रे- एच/पूर्व 1              5.55 कोटी
मुलुंड-टी 1                   5.51 कोटी
अंधेरी-के/पश्चिम 2         30.88 कोटी
गोरेगाव-पी/उत्तर 3        36.19 कोटी
दहिसर-आर/उत्तर 1        5.02 कोटी
बोरिवली-आर/मध्य 2     28.10 कोटी
कांदिवली-आर/दक्षिण 2  32.85 कोटी