विद्यार्थ्यांना दिलेल्या टॅबचा सद्यस्थितीचा अहवाल द्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिका शाळांच्या विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेले काही टॅब बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असा आरोप करत आज शिक्षण समितीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यावर वितरण केलेल्या सर्व टॅबचा सद्यस्थितीचा अहवाल पालिका प्रशासनाने सादर करावा, असे आदेश शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी दिले आहेत.

पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी व्हावे यासाठी 8 वी, 9 वी आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांना 2014 पासून टॅब वितरित करण्यात आले. मात्र, यातील काही टॅब आता बंद आहेत. 10वीच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. पण काही टॅब बंद असल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याची वस्तुस्थिती काय आहे हे आम्हाला कळलेच पाहिजे, असा हरकतीचा मुद्दा मांडण्यात आला. त्याला शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला. पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या टॅबचे अपग्रेडेशनही झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असा आरोप शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, सईदा खान, अल नासीर झकेरिया यांनी केला. टॅबचे अपग्रेडेशन का झाले नाही, पालिका प्रशासनाला काही अडचणी होत्या का? विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे ‘ई- अभ्यासक्रमा’मुळे हलके होणार आहे. ते हलके होऊ नये असे प्रशासनाला वाटते का, अशा प्रश्नांची सरबत्ती करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले. बंद पडलेले टॅब दुरुस्ती करण्याऐवजी विद्यार्थ्यांना नवीन टॅब द्या, अशी मागणी साईनाथ दुर्गे यांनी केली. त्यावर पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या सर्व टॅबचा सद्यस्थितीचा अहवाल पालिका प्रशासनाने सादर करावा, असा आदेश शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी दिले आहेत.

  • विशेष मुलांसाठी मुंबईत पालिकेच्या 17 शाळा चालतात. त्यात 1815 मुले शिकतात. मात्र, या शाळांच्या पाटय़ांवर मतिमंद मुलांची शाळा असे लिहिले आहे. पालिका प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन पाटय़ा बदलाव्यात आणि पाटय़ांवर ‘विशेष मुलांची मनपा शाळा’ असे लिहिले जावे, अशी मागणी साईनाथ दुर्गे यांनी केली. त्यावर दोन आठवडय़ांत या पाटय़ा बदला आणि बदललेल्या नावांच्या फोटोसह अहवाल सादर करा, असे आदेश दिले.