
मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पालिका आयुक्त आणि चार अतिरिक्त आयुक्तांच्या दालनाबाहेर बाऊन्सरच्या लूकमध्ये पालिकेचे सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्या लूकमुळे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनी त्यांच्या दालनाबाहेर खासगी सुरक्षारक्षकांची नेमणूक केल्याच्या वावडया उडाल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, पालिका मुख्यालयात सोमवारी गटनेत्यांची बैठक झाली. या बैठकीला पालिका आयुक्त व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे उपस्थित होते. मात्र, एकाच इमारतीत असल्यामळे आयुक्तांनी समिती सभागृहात प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असा आग्रह करत विरोधकांनी गोंधळ घातला आणि सभात्याग केला. त्याच्या दुसर्याच दिवशी बाऊन्सरच्या वेशात पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या दालनासमोर सुरक्षारक्षक तैनात केल्यामुळे विरोधकांनी गटनेत्यांच्या बैठकीतील गोंधळामुळेच आयुक्तांनी घाबरून खासगी सुरक्षारक्षक मागवले, अशी टीका केली.
सुरक्षारक्षक स्मार्ट दिसले पाहिजेत – आयुक्त
माझ्या आणि अतिरिक्त आयुक्तांच्या दालनासमोर तैनात करण्यात आलेले सुरक्षारक्षक हे पालिकेचेच आहेत. पालिका मुख्यालयात शेकडो व्हिजिटर्स येत असतात. त्यामुळे सुरक्षारक्षक स्मार्ट दिसावेत, यासाठीच त्यांना वेगळा पोशाख दिला आहे. स्वःसंरक्षणासाठी सुरक्षा लावायचीच असती तर आम्ही हत्यारबंद मुंबई पोलिसांची मदत घेतली असती. आम्ही तसे केलेले नाही. ते आपले नेहमीचे सुरक्षारक्षक आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली.





















































