पालिकेत शिवसेनेची बदनामी करण्यासाठीच भाजपचे षड्यंत्र!  प्रकरणाचा लवकरच भंडाफोड करणार

मुंबईत शिवसेनेच्या माध्यमातून विकासकामांचा धडाका सुरू असल्यामुळे भाजपच्या पायाखालची जमीन सरकू लागली असून त्यांना आतापासूनच पराभव दिसू लागला आहे. त्यामुळेच शिवसेनेची बदनामी करण्यासाठी कंत्राटदारांना हाताशी धरून आपल्यावर धमकावल्याचा नाहक आरोप केल्याचे भाजपचे षड्यंत्र असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आज स्पष्ट केले. मात्र भाजपच्या या कटाचा लवकरच पुराव्यानिशी भंडाफोड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कंत्राटदाराला धमकावल्याचे एका वर्तमानपत्रात प्रकाशित झालेले वृत्त सपशेल खोटे असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले. संबंधित कंत्राटदाराने इतर वॉर्डमध्ये केलेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत. त्यामुळेच संबंधित कंत्राटदाराला काम देऊ नये अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

टी वॉर्डमध्येही संबंधित कंत्राटदाराने कामे केली आहेत. आता कुणाच्या तरी सांगण्यावरून जाणीवपूर्वक ई वॉर्ड भायखळा येथील कामांसाठी निविदा भरल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. कंत्राटदाराच्या आडून शिवसेनेला बदनाम करण्यासाठीच भाजपचे हे छुपे कारस्थान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या कंत्राटदाराच्या वशिल्यासाठी आलेल्या फोनच्या क्लिप आपल्याकडेही आहेत. त्या लवकरच जाहीर करू असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, निकृष्ट कामे  करणाऱया कंत्राटदारांवर दक्षता विभागाने काय कारवाई केली, असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला.

ई-टेंडर पद्धत बंद करा!

ई-टेंडर पद्धतीत कंत्राटदाराच्या कामावर नियंत्रण राहत नसल्याने कामे निकृष्ट केली जातात. त्यामुळे मुंबईकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. ई – टेंडर पद्धत भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी आहे. त्यामुळे तत्कालीन भाजप मुख्यमंत्र्यांच्या काळात जाणीवपूर्वक घेण्यात आलेला ई-टेंडरिंगचा निर्णय रद्द करावा आणि सीडब्ल्यूसी पद्धत पुन्हा लागू करावी मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचेही यशवंत जाधव यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या