
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मुंबई महानगरपालिकेतील पक्ष कार्यालयात मिंधे गटाने आज ‘घुसखोरी’ करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी दाखल झालेल्या निष्ठावंत कडवट शिवसैनिक-पदाधिकार्यांनी ‘मिंधे’ गटाला जोरदार घोषणाबाजीने प्रत्युत्तर दिले. ‘पन्नास खोके, एकदम ओके’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘आदित्य ठाकरे आगे बढो’ अशा गगनभेदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. अखेर पोलिसांनी दोन्ही गटांना आवाहन करून पक्ष कार्यालयातून बाहेर काढले. यावेळी ‘मिंधे’ गटाने काढता पाय घेतला.
मुंबई महानगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपल्यापासून पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती गेला आहे. मात्र शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात मुंबईच्या विविध प्रश्नांसंबंधात माजी नगरसेवक-पदाधिकार्यांच्या बैठका नियमितपणे होत असतात. मात्र आज सायंकाळी 4.45च्या सुमारास पक्ष कार्यालयात शिवसेनेचे निवडक पदाधिकारी उपस्थित असताना अचानक ‘मिंधे’ गटाचे कार्यकर्ते पक्ष कार्यालयात आले. त्यांनी कार्यालयात उपलब्ध खुर्च्यांवर बस्तान मांडले. मात्र कार्यालयात उपस्थित कर्मचार्यांनी ‘मिंधे’ गटातील कुणाचीही साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे मोठ्या अविर्भावात आलेल्या ‘मिंधे’ गटाचा पचका झाला.
दरम्यान, काही वेळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले. यावेळी दोन्ही गटांत बाचाबाचीही झाली. मात्र शिवसैनिकांनी दिलेल्या जोरदार घोषणांपुढे ‘मिंधे’ गट नरमला. सुरक्षेचे कारण देत पोलिसांनी त्यांना कार्यालयाबाहेर काढल्यानंतर त्यांनी पालिकेतून सरळ काढता पाय घेतला. मात्र शिवसैनिकांची कार्यालयाबाहेरही जोरदार घोषणाबाजी सुरू होती. यावेळी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, माजी नगरसेवक आशीष चेंबूरकर, सदा परब, रमाकांत रहाटे, सचिन पडवळ, गणेश सानप, सुजाता सानप, श्रीकांत शेट्ये यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक-पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, या प्रकारामुळे तब्बल पाऊण तास महापालिकेत तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
हिंमत असेल तर शिवसैनिक असताना या!
आयुक्तांना भेटायला आलेले ‘मिंधे’ गटाचे काहीजण पोलिसांची सुरक्षा घेत अचानक शिवसेनेच्या कार्यालयात चोरासारखे घुसले. त्यांच्यात जर हिंमत असेल तर शिवसैनिक-पदाधिकारी असताना असा प्रयत्न पुन्हा उद्या करून दाखवावा, असे आव्हानच विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी ‘मिंधे’ गटाला दिले. तर मुंबईत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगरसेवकांची संख्या सर्वाधिक असताना ‘मिंधे’ गट कार्यालयावर दावा कसा करू शकतो, असा थेट सवाल ‘बेस्ट’चे माजी अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी उपस्थित केला. पक्षकार्यालयात चोरासारखे घुसण्याचा प्रकार चुकीचा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.





























































