पालिकेत शिवसेनेचा भाजपला ‘जोर का झटका’! 12 प्रभाग समित्यांवर भगवा फडकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेने वैधानिक समित्यांच्या निवडणुकांमध्ये निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर प्रभाग समित्यांवरही डौलाने भगवा फडकवला आहे. आज झालेल्या सहा प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने चार ठिकाणी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे एपूण 17 पैकी 12 प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी शिवसेना उमेदवार विराजमान झाले तर भाजपला पाच जागांवर समाधान मानावे लागले. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत शिवसेनेच्या चार जागा वाढल्या असून भाजपचा चार ठिकाणी घाटा झाला आहे.

पालिकेच्या वैधानिक समित्यांच्या निवडणुकीपासूनच शिवसेनेने भाजपला चांगलाच दणका दिला आहे. प्रभाग समित्यांच्या निवडणुकांमध्येही भाजपला धूळ चारत आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षी एपूण 17 पैकी 9 प्रभाग समित्यांवर भाजपचे अध्यक्ष होते तर 8 ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार अध्यक्ष होते. आज झालेल्या निवडणुकीत ‘आर-मध्य’ आणि ‘आर-उत्तर’ प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुजाता पाटेकर यांनी 10 मते मिळवित भाजपच्या आसावरी पाटील यांचा 2 मतांनी पराभव केला. ‘एन’ प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या स्नेहल मोरे यांनी 8 मते मिळवित भाजपच्या बिंदू त्रिवेदी यांचा पाच मतांनी दणदणीत पराभव केला. ‘एस आणि टी’ प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दीपमाला बढे यांनी 10 मते मिळवत भाजपच्या जागृती पाटील यांचा एका मताने पराभव केला. या निवडणुकांसाठी पीठासीन अधिकारी म्हणून महापौर किशोरी पेडणेकर होत्या. ‘एम पूर्व’ प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे विठ्ठल लोकरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तर ‘एम पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या महादेव शिवगण यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तर ‘आर दक्षिण’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्या लीना पटेल-देहेरकर यांनी शिवसेनच्या एकनाथ (शंकर) हुंडारे यांचा पराभव केला. या निवडणुकांमध्ये पीठासीन अधिकारी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर होते.

शिवसेनेच्या रणनीतीने भाजपला दणका!
वैधानिक समित्यांच्या निवडणुकीत संख्याबळ कमी असूनदेखील भाजपने सर्व ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. मात्र शिवसेनेच्या रणनीतीमुळे विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने शिवसेनेला साथ दिली. वैधानिक समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने अर्ज मागे घेतले तर राष्ट्रवादी, ‘सपा’ने शिवसेनेला मतदान केले. यामुळे विरोधी पक्षाच्या मदतीच्या आशेवर असणाऱया भाजपला शिवसेनेच्या रणनीतीने चांगलाच दणका दिला. तर प्रभाग समितीच्या निवडणुकीतही विरोधी पक्षांनी शिवसेनेला साथ दिल्याने भाजपला पुन्हा धक्का बसला.

‘एस आणि टी’वरून भाजपचा ठिय्या
‘एस आणि टी’ प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या एका सदस्याचे एक मत अवैध ठरले. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून समान मते असताना शिवसेना उमेदवाराचा एका मताने विजय झाला. मात्र यावेळी पराभव सहन न झालेल्या भाजपने महापौर, चिटणीस यांच्यावर आरोप करीत ठिय्या आंदोलन केले, मात्र भाजपचे हे आंदोलन म्हणजे नाहक केलेले राजकारण आणि नौटंकी असल्याची टीका शिवसेनेने केली आहे.