मुंबईकरांना दिलासा; स्थायी समितीने पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव रोखला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-2

इमारती, बंगले, सोसायटी, हॉटेल आणि व्यावसायिक पाणीपुरवठ्यात दरडोई वापरापेक्षा जादा वापरल्या जाणाऱ्या पाण्यासाठी दुप्पट ते पाचपट वाढीव पाणीपट्टी आकारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने रोखला. शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी याला जोरदार विरोध केल्याने संबंधित प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाकडे परत पाठवला.

150 लिटरपेक्षा अधिक वापर करणाऱ्या व्यावसायिक आणि इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून वाढीव पाणी वापरासाठी दुप्पट ते पाचपट पाणीपट्टी वसूल करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी प्रशासनाकडून सादर करण्यात आला होता. मात्र कोरोनाच्या परिस्थितीत आर्थिक अडचणीत असलेल्या मुंबईकरांवर करवाढ लादू नये अशी मागणी करीत विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी प्रस्ताव रेकॉर्ड करण्याची मागणी केली. याला शिवसेनेसह राष्ट्रवादी, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि भाजपनेही पाठिंबा दिला

… म्हणूनच आणला दरवाढीचा प्रस्ताव
पाणी पुरवठय़ाच्या राष्ट्रीय प्रमाणकानुसार प्रती व्यक्ती दररोज 150 लिटर इतका पाणी वापर हवा, परंतु मुंबईत अनेक इमारतींमध्ये दररोज दरोडोई पाणी वापर हा 150 लिटरपेक्षा जास्त होत आहे. त्यामुळे या जास्तीच्या पाण्याला ‘दुरेक्ष दर पद्धती’नुसार जास्त दर लावण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर आणला होता. तसेच ‘ओसी’ नसलेल्या इमारतींमध्येही पुरवठा होणाऱ्या पाणीदरातही याचप्रमाणे वाढ केली जाणार होती.

अशी होणार होती दरवाढ
सध्या दरडोई 150 लिटर पाणी वापरणाऱ्यांना 1 हजार लिटरसाठी 5.22 रुपये दर आहे. तर 150 ते 200 लिटर पाणी वापरणाऱ्यांसाठी 10.44 रुपये इतका दर आहे ज्याचा प्रस्तावित दर 20.88 रुपये इतका होता. तर 200 ते 250 लिटर्सकरता 15.66 वरून 26.10 रुपये इतका आणि 250 हून अधिक लिटरकरता 20.88 वरून 31.32 रूपये इतका दर प्रस्तावित होता.