
शहर व उपनगरातील विकासकामे रखडवणाऱया कंत्राटदार आणि अभियंत्यांना मुंबई महापालिकेने मोठा दणका दिला आहे. विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण न केल्यास पुढील प्रत्येक महिन्यात अभियंत्यांचा 50 टक्के पगार कापला जाणार आहे, तर कंत्राटदाराला कंत्राटाच्या 20 टक्के रक्कम गमवावी लागणार आहे. पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी या कारवाईचा आदेश दिला आहे.
महापालिकेकडून सध्या शहरात कोटय़वधींची विकासकामे केली जात आहेत. या कामांची रखडपट्टी होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने अभियंते आणि कंत्राटदारांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. 50 कोटींहून अधिक रकमेची कंत्राटे दिलेल्या कंत्राटदारांसह विभागप्रमुख आणि खातेप्रमुखांची आढावा बैठक आयुक्तांनी घेतली होती. या बैठकीत विकासकामे रखडवणाऱया तसेच संबंधित कामांवर योग्य देखरेख न ठेवणाऱया कार्यकारी अभियंता व विभागप्रमुखांचा पगार कापण्याची सूचना करण्यात आली होती. त्या सूचनेची दखल घेत पालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीने बुधवारी एक परिपत्रक जारी करण्यात आले. त्यात विकासकामांच्या रखडपट्टीबाबत कार्यकारी अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. यापुढे विकासकामे रखडवणाऱया अभियंत्याचा पगार तसेच कंत्राटदारांच्या कंत्राट रकमेला कात्री लावली जाणार आहे.
कंत्राट खर्चावर परिणाम
कंत्राट मंजूर होऊन कार्यादेश दिल्यानंतरही विकासकामे वेळेत पूर्ण होत नाही. निर्धारित कालावधी संपून तीन-चार वर्षे उलटली तरी विकासकामांचे घोंगडे भिजत पडलेले असते. परिणामी, कंत्राट खर्च दुपटीने वाढतो. ही रखडपट्टी रोखण्यासाठी पालिकेने कार्यकारी अभियंते, कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.



























































