शालेय वस्तू पुरवठ्यात दिरंगाई; कंत्राटदारांना पालिकेचा दणका

293
bmc-2

पालिकेच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱया शालेय वस्तूंच्या पुरवठय़ात दिरंगाई करणाऱया कंत्राटदारांवर पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, आतापर्यंत 60 टक्के शाळांमध्ये या वस्तूंचे वितरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे 30 ऑगस्टपर्यंत उर्वरित सर्व शाळांमध्ये शालेय वस्तूंचे वाटप पूर्ण करण्याची डेडलाइन कंत्राटदारांना देण्यात आली आहे.

पालिकेकडून विद्यार्थ्यांना 27 शालोपयोगी वस्तू मोफत दिल्या जातात. शाळा सुरू होताच या वस्तू मिळणे आवश्यक असते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या वर्षी टेंडरप्रक्रिया रखडल्याने शालेय वस्तू वाटपाला उशीर होणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. मात्र किमान 15 ऑगस्टपूर्वी सर्व शाळांमध्ये वस्तूंचे वाटप पूर्ण करावे असे निर्देश संबधित कंत्राटदारांना देण्यात आले होते.

अत्यावश्यक साहित्य मिळाल्याने गैरसोय टळली
आतापर्यंत 60 टक्के शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सर्व 27 वस्तूंचे वाटप पूर्ण झाल्याचे शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी सांगितले, तर उर्वरित 40 काम 30 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, विद्यार्थ्यांना पावसाळ्यासाठी लागणारे रेनकोट, सँडल आणि आवश्यक सर्व पुस्तके देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या