महापालिका खरेदी करणार सात शीत शवपेटय़ा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिका प्रायोगिक तत्त्वावर सात शीत शवपेटय़ा खरेदी करणार आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही कारणास्तव त्याचा मृतदेह पाच–सहा तासांहून अधिक काळ ठेवाका लागल्यास या शवपेटय़ा उपयुक्त ठरणार आहेत. मात्र या पेटय़ा देताना अटी काय असाव्यात, त्याचे शुल्क किती असावे याबाबतचा मसुदा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.

एखाद्या व्यक्तीचा संसर्गजन्य आजाराने मृत्यू झाल्यास त्या आजाराचा इतरांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. हा धोका टाळण्यासाठी पालिकेने मृतदेहांसाठी फिरत्या शवपेटय़ा मोफत पुरवाव्यात अशी मागणी नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी केली होती. त्यांच्या मागणीला अनुसरून पालिका प्रशासनाने सकारात्मक विचार केला आहे. मुंबईत सध्या खासगी स्वरूपात शीत शवपेटय़ा पुरवल्या जातात. मात्र त्यासाठी अवाजवी दर आकारले जातात. पालिकेने मोफत शवपेटय़ा पुरवल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. एका शवपेटीची किंमत 65 हजार रुपये आहे. प्रायोगिक तत्वावर प्रत्येक परिमंडळासाठी एक याप्रमाणे सात शवपेटय़ा खरेदी केल्या जाणार असून त्यावर साडेचार लाख रुपये खर्च केला जाणार आहे.