पालिकेचे हँगिंग गार्डन भक्कम होणार! आयआयटीच्या सल्ल्यानुसार काम

मलबार हिलजवळ असणारे पालिकेचे कमला नेहरू उद्यान म्हणजेच हँगिंग गार्डन आता आणखी मजबूत होणार आहे. आयआयटीच्या सल्ल्यानुसार हे काम केले जाणार आहे. अतिवृष्टीत काही वेळा परिसरातील जमीन खचण्याचे प्रकार घडत असल्याने धोका टाळण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षी दक्षिण मुंबईत झालेल्या अतिवृष्टीत मलबार हिलचा मोठा भाग कोसळला आहे. हा भाग सध्या दुरुस्त करण्यात येत आहे. टेकडीच्या या भागाला लागूनच हँगिंग गार्डन आहे. तसेच टेकडीवरच जलाशय आहे. उद्यान आणि जलाशय टेकडीच्या टोकाला आहे. त्यामुळे या टेकडीच्या उतारावरील भाग मजबूत करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पारंपरिक पध्दतीने या टेकडीचे मजबुतीकरण केल्यास नैसर्गिक सौंदर्याला बाधा पोहचून तेथे काँक्रीटचे जंगल तयार होईल. त्यामुळे टेकडीचे सौंदर्य कायम ठेवून मजबुतीकरण करण्यासाठी पालिका आयआयटी मुंबईची मदत घेणार आहे. यामध्ये प्राथमिक सर्वेक्षणासाठी खासगी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येत आहे. या कामासाठी पालिका एकूण 32 लाख रुपये खर्च करणार आहे. यामध्ये मुंबई आयआयटीला 20 लाख 70 हजार रुपये शुल्क देण्यात येणार आहे.

असे होणार काम

नैसर्गिक सौंदर्याचा परिसर असणाऱया या भागाचे मजबुतीकरण शास्त्राrय पद्धतीने केले जाणार आहे. त्यासाठी आयआयटीने ड्रोन सर्वेक्षण, भौगोलिक सर्वेक्षण, जल विज्ञान सर्वेक्षण, दहा वर्षांच्या पावसाची तीव्रता याचा अभ्यास करून आयआयटी या दुरुस्तीचा आराखडा तयार करणार आहे. हे सर्वेक्षण तसेच आयआयटीला आवश्यक माहिती जमा करण्यासाठी पेडणेकर ऍण्ड असोसिएट या सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी 11 लाख 75 हजार रुपयांचे शुल्क पालिका देणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या