
वृक्षनगरी असा बहुमान मिळालेल्या मुंबईतील झाडे आता त्यांना ठोकण्यात आलेल्या खिळे, फलक आणि केबलपासूनही मुक्त होणार आहेत. मुंबई महापालिका त्यासाठी 18 ते 23 एप्रिल अशी वृक्ष संजीवनी मोहीम राबवणार आहे. या मोहिमेत महापालिकेला पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्था, एनजीओ आणि शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी सहकार्य करणार आहेत.
मुंबई महापालिकेचा उद्यान विभाग पर्यावरण साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या वृक्षांचे संरक्षण, जतन, संवर्धन करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. याचाच एक भाग म्हणून मुंबईत वृक्ष संजीवनी मोहीम राबवली जाणार आहे. वृक्ष संजीवनी मोहिमेत प्रामुख्याने मुंबईतील रस्त्यांवरील आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या झाडांभोवतीचे काँक्रीट, झाडांवरील जाहिरात फलक, खिळे, विद्युततारा, केबल काढणे ही कामे केली जाणार आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागामार्फत ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे.
राष्ट्रीय हरित लवादाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, झाडांभोवती मोकळी जागा सोडणे तसेच झाडांवर जाहिरात फलक, नामफलक, विद्युततारा आढळल्यास ते काढणे आवश्यक आहे. यासाठी ही मोहीम राबवली जाणार असून सामाजिक संस्था, एनजीओ, शाळा, महाविद्यालये यांना आवाहन करण्यात येणार आहे. त्यामुळे मोहिमेची व्याप्ती वाढून जनजागृती होईल आणि युवा पिढीदेखील पर्यावरणरक्षणाच्या कामात जोडली जाईल.
– जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक

























































