
सायकल ट्रॅक, आकर्षक फुटपाथ, पाण्याची स्वच्छता आणि सौंदर्यीकरण अशी कामे केल्यामुळे पवई तलाव आणि परिसराचे रूपडे पालटणार आहे. पालिकेच्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या सौंदर्यीकणाची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना बैठकीत सादर केली.
पवई तलाव म्हणजे मुंबईतील पर्यटनाचे महत्त्वाचे आणि सर्वांच्या पसंतीचे ठिकाण आहे. त्यामुळे या परिसराचे जतन आणि सौंदर्यीकरण करण्याचा प्रकल्प पालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत असल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले. तलावालगत सायकल मार्गिका, पादचारी मार्ग या संदर्भात संगणकीय सादरीकरण बैठकीत सादर करण्यात आले. या तलावामध्ये सांडपाणी येण्यापासून रोखणे, तलावातील पाण्याचा दर्जा सुधारण्यासाठी तरंगती वायूविजन व्यवस्था, पाण्यातील वनस्पती काढण्याचे काम केले जात आहे.
पवई तलावाचे पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरण करताना तलावाभोवती फिरण्यासाठी सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या प्रकल्पाचा विस्तार करण्याचे नियोजित आहे. तसेच निसर्ग उद्यान, आंबेडकर उद्यान आणि मोरारजी नगर मृग उद्यान नूतनीकरण करण्यात येणार आहे. या सर्व कामांसाठी महानगरपालिकेने तत्त्वतः मंजुरी दिली असून कंत्राटदारांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.
आयआयटीच्या सल्ल्यानुसार काम
सबंधित कामे केल्यानंतर कंपन्या परीरक्षण करण्यासाठी खासगी पंपन्या तयार असल्यास संबंधितांशी चर्चा करावी असे निर्देश यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिले. पालिकेच्या माध्यमातून सुरू असणारी कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत, कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही सर्व कामे करताना खबरदारीच्या उपाययोजना योग्य प्रकारे करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
आयआयटी मुंबईकडून प्रकल्पासाठी तांत्रिक मार्गदर्शन व सहकार्य लाभत असून या कामांकरिता पालिकेने निधीदेखील उपलब्ध दिला असल्याचे पी. वेलरासू यांनी सांगितले. पुरातन वास्तूजतन समितीने परवानगी दिल्यानंतर टप्प्या-टप्प्याने ही नियोजित विस्तारित कामे हाती घेण्यात येतील, असे वेलरासू यांनी स्पष्ट केले.

























































