पालिका सुरू करणार ‘क्लायमेट चेंज’ विभाग , तापमानवाढीबाबत पालिका गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक तापमान वाढीविरोधात पालिकेने गंभीरपणे पाऊल उचलले असून 2021-22 मध्ये ‘क्लायमेट चेंज’ विभाग सुरू करण्यात येणार आहे. सी-40 या जागतिक स्तरावरील आंतरराष्ट्रीय पर्यावरण चळवळीशी महानगरपालिका जोडली गेली असून त्याअंतर्गत हा विभाग सुरू करण्यात येणार आहे. या विभागामार्फत तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय शोधले जाणार आहेत.

पॅरिस करारानुसार 2030पर्यंत तापमानात होणारी वाढ रोखण्यासाठी सी-40 ही चळवळ सुरू झाली. तापमान वाढ रोखण्यासाठी उपाय शोधणे ते इतर शहरांना सुचवणे अशी देवाणघेवाण या चळवळीतून केली जाते. हिंदुस्थानातील बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, जयपूर, दिल्ली ही शहरे या चळवळीत या आधीच सहभागी झाली आहेत. जगभरातील 97 शहरे या चळवळीशी जोडली गेली आहेत. मुंबई महानगरपालिकेने तापमानवाढीवर उपाय म्हणून ‘हरित ऊर्जे’चा पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. यात मध्य वैतरणा धरणावर 20 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प उभारण्याबरोबरच 80 मेगावॅट क्षमतेचे तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पालिकेच्या ज्या इमारती, भूखंडांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे शक्य असेल अशा ठिकाणी प्रकल्प उभारणीला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कचऱयापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारणीलाही प्राधान्य देण्यात येणार आहे.