पालिका करणार जलाशयांच्या भिंतींचे मजबुतीकरण; अतिक्रमणही रोखणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुसळधार पावसात सोमवारी मध्यरात्री मालाड येथे संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 26 जणांचा मृत्यू तर सुमारे 75 लोक जखमी झाले. या पार्श्वभूमीवर जलाशयांच्या भिंतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालिकेने जलाशयांच्या भिंतींचे मजबुतीकरण आणि या ठिकाणी होणारे अतिक्रमण रोखण्याची कार्यवाही सुरू केली आहे. यामध्ये बोरिवली आणि रावळी येथील जलाशयांना काँक्रीटची मजबूत भिंत बांधली जाणार आहे. यासाठी सात कोटींचा खर्च केला जाणार आहे.

मालाड येथील घटनेत पाकसाच्या पाण्याच्या दाबाने भिंत पडली असल्याचा अंदाज प्राथमिक अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अँटॉप हिल, रावळी कॅम्प आणि बोरिवली येथील जलाशयांच्या भिंतींचे क्राँक्रीटीकरण करून या भिंती मजबूत केल्या जाणार आहेत. या दोन्ही भिंतींची सुमारे साडेसहा कोटी रुपये किमतीची कामे ऍक्युट डिझाईन्स या ठेकेदाराला देण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

रावळी जलाशयाची 1998 मध्ये बांधण्यात आलेली संरक्षक भिंत विटांची असून ही भिंत सध्या मोडकळीस आली आहे. येथे होणारे अतिक्रमण थांबवण्यासाठी काँक्रीटची भिंत बांधण्यात येणार असून त्यासाठी 2 कोटी 87 लाख 70 हजार रुपये खर्च केले जाणार आहे.
बोरिवली जलाशयाची सध्या अस्तित्वात असलेली दगडी भिंत 1992 साली बांधण्यात आली असून ही भिंतही सध्या मोडकळीस आली आहे. येथेही अतिक्रमणे व दुर्घटना होऊ नये म्हणून काँक्रीटची उंच भिंत बांधण्यात येणार आहे. या भिंतीसाठी 4 कोटी 70 लाख 91 हजार रुपये खर्च येणार आहे.

भिंतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार
मालाडमध्ये भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 26 जणांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील संरक्षक भिंतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. पालिका आयुक्तांनी याला तत्त्वतः मान्यता दिली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी आज पालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर बोलताना दिली.