दुकाने, टपरीतील बेकायदा पोटमाळे पालिकेच्या रडारवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील दुकाने, टपरींमध्ये बांधलेले बेकायदा पोटमाळे पालिकेच्या रडारवर आले आहेत. अशा बेकायदा बांधलेल्या पोटमाळ्यांमुळे पालिकेचा महसूल बुडतो. त्यामुळे हे बेकायदा पोटमाळे रितसर नियमित केले जाणार आहेत. पण त्यासाठी त्यांच्याकडून दोनशे पट कर आकारला जाणार आहे. तसा प्रस्ताव पालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

मुंबईत काही ठिकाणी आराखडय़ापेक्षा अतिरिक्त बांधकाम किंवा पोटमाळे बांधले गेले आहेत. सामानासहित इतर साहित्य ठेवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो तर काही वेळा अशा पोटमाळय़ांवर झोपण्याची व्यवस्थाही केलेली असते. असे पोटमाळे बांधताना पालिकेची परवानगी, सुरक्षेची कोणतीच हमी घेतली जात नाही. शिवाय मोठय़ा प्रमाणात पालिकेचा महसूल बुडवला जातो. आगीच्या घटना घडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता असते. साकीनाका येथील खैरानी रोडवरील गोदामांना आग लागून बहुतांश गोदामे जळून खाक झाली. यात दोघा जणांचा मृत्यू झाला होता. या आगीच्या चौकशीत गोदामातील पोटमाळे बांधल्याचे उघड झाले होते.

पालिकेचे नुकसान थांबेल, महसूल वाढेल!
काही दुकानांतील पोटमाळे बेकायदेशीर असतात. याचा वापर दुकानदार करत असले तरी त्याचा अतिरिक्त कर पालिकेला भरत नाहीत. त्यामुळे पालिकेचा महसूल बुडतो, पालिकेचे नुकसान होते. अशा दुकानदारांकडून दोनशे ते तीनशे पट कर आकारून हे पोटमोळे नियमित केले जातील. त्यामुळे महापालिकेच्या महसुलात वाढ होईल, अशी माहिती विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे यांनी दिली.