पालिकेचे व्हर्च्युअल क्लासरूम ‘भंगारात’! शिवसेनेच्या सरप्राईज व्हिजिटने प्रशासनाची पोलखोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉम्प्युटर बंद, सर्व्हर बंद, एसी, प्रक्षेपण बंद आणि शिक्षकच नाहीत अशी दयनीय स्थिती पालिकेच्या व्हर्च्युअल क्लासरूमची झाली असून हे स्टुडिओ अक्षरशः भंगारात गेले आहेत. शिवसेनेच्या पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि नगरसेवक साईनाथ दुर्गे यांनी व्हर्च्युअल क्लासरूमना भेट देऊन पालिकेच्या हलगर्जीपणाची पोलखोल केली.

तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना चार व्हर्च्युअल क्लासरूम उपलब्ध करून देण्यात आले. शिवसेना नेते- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने अनेक तज्ज्ञ, प्रख्यात व्यक्तिमत्त्वे व मान्यवरांनी येथे येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. मात्र सद्यस्थितीत चारपैकी एकच व्हर्च्युअल क्लासरूम सुरू असून इतर क्लासरूमची अवस्था ठप्प पडल्यासारखी आहे. दादर पूर्व येथील दस्तुरवाडी क्लासरूम केंद्राला पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि साईनाथ दुर्गे यांनी भेट देऊन दुरवस्थेबाबत माहिती दिली. हे क्लासरूम विद्यार्थ्यांना पुन्हा उपलब्ध करून देण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे.

असा आहे उपक्रम

दादर पूर्व येथे 4 अत्याधुनिक स्टुडिओ उभारण्यात आले व सुमारे 480 शाळा या प्रणालीशी जोडण्यात आल्या. अंदाजे 21 कोटी खर्च करून उभारलेल्या या उपक्रमातून मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांकडून दर्जेदार, डिजिटल व समकालीन शिक्षण दिले जात होते. या माध्यमातून शिक्षक अनुपस्थित असतानाही वर्ग घेण्याची सोय उपलब्ध होती. डिजिटल साधने व विशेष व्याख्यानांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत होते.