आलिशान रोल्स रॉयसची बनवली टुरिस्ट कॅब, केरळचे उद्योगपती बॉबी चेम्मानूर यांचा कारनामा

केरळचे प्रसिद्ध उद्योगपती बॉबी चेम्मानूर हे महागडय़ा गाडय़ांचे शौकीन आहेत. त्यांच्याकडे देशी-विदेशी कारचे कलेक्शन आहे. त्यावरून ते नेहमी चर्चेत असतात. नुकतंच बॉबी चेम्मानूर यांनी लक्झरी रोल्स रॉयस फँटम या आलिशान कारचे रूपांतर टुरिस्ट कॅबमध्ये केल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी टुरिस्ट कॅबला म्हणजेच रोल्स रॉयसला पूर्ण सोनेरी रंग दिला आहे.

बॉबी चेम्मानूर यांनी आपल्या रिसोर्टमध्ये येणाऱया पर्यटकांना आलिशान गाडय़ा या टुरिस्ट कॅब स्वरूपात भाडेतत्त्वावर द्यायला सुरुवात केली आहे. त्यासाठी एका दिवसासाठी 25 हजार रुपये एवढे भाडे आकारले जात आहे. याविषयी चेम्मानूर सांगतात, माझ्याकडे रोल्स रॉयस, मर्सिडीज बेंज, रेंज रोवर आणि अन्य गाडय़ांचे मोठे कलेक्शन आहे. या लक्झरी कारला टुरिस्ट टॅक्सीमध्ये रुपांतरित करावं, असा विचार माझ्या मनात आला.

सध्या मुन्नार येथील रिसोर्टमधील पर्यटकांना अशी कॅबसेवा दिली जात आहे. कोरोना काळात आम्ही टुरिस्ट कॅब सुरू केली आहे. आता त्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. एका लग्नासाठी 50 हजार रुपये भाडे घेत आहोत. साडेनऊ कोटींच्या फँटम कारसाठी खूप बुकिंग येत आहे, असेही चेम्मानूर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या