बेरोजगारांना फसविणारे बोगस कॉल सेंटर उद्ध्वस्त, महिलेसह तिघांना अटक

171

दिल्लीत ‘फ्री स्काय लक्झरी सोल्युशन्स’ नावाने भाडय़ाच्या जागेत बोगस कॉल सेंटर थाटून देशभरातील अनेक बेरोजगारांना लाखो रुपयांचा चुना लावणाऱया चौघांचा गौरखधंदा माटुंगा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. नोकरीच्या शोधात असणाऱयांना पद्धतशीर आपल्या जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱया या चौघांना दिल्लीत जाऊन पोलिसांनी अटक केली.

योगेश राठोड (29) या नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाने ‘क्विकर डॉट कॉम’ या संकेतस्थळावर त्याचा बायोडाटा अपलोड केला होता. तेथून माहिती घेऊन आरोपींनी योगेशची दीड लाखाची फसवणूक केली होती. याप्रकरणी त्याने तक्रार दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबराव सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मारुती शेळके, शिल्पा ठेंगे तसेच अंमलदार संतोष पवार, विकास मोरे, सचिन गायकवाड या पथकाने तपास सुरू केला. योगेशला ज्या मोबाईल नंबरवरून कॉल आले होते त्याचा बारकाईने अभ्यास करीत असताना मारुती शेळके यांना एका महिलेचा गुह्यात सहभाग असल्याचे समजले. त्यानुसार शेळके व त्यांच्या पथकाने उत्तर प्रदेशातील रामपूर गाठून रोहिणी (नाव बदललेले) या तरुणीला ताब्यात घेतले. चौकशीत तिने गुन्हा केल्याचे कबूल करून अन्य तिघा साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार शेळके व पथकाने दिल्लीत राहणारे अंकुर सिंग (29), अमनकुमार सिंग (24) आणि शेहजाद मो. मकबूल (26) या तिघांना पकडले. या चौघांनी मिळून अनेक बेरोजगारांना नोकरी देण्याच्या बहाण्याने फसविल्याचे कबूल केले असल्याचे उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी सांगितले.

असे काढायचे पैसे
क्विकर, नोकरी डॉट कॉम या संकेतस्थळांवर नोकरीसाठी बायोडाटा अपलोड करणाऱ्यांची माहिती आरोपी मिळवायचे. त्यानंतर संबंधिताला फोन करून तुमची एका बडय़ा कंपनीत चांगल्या हुद्दय़ासाठी निवड झाल्याचे सांगून त्याला रजिस्ट्रेशन करणे, मुलाखत, इन्शुरन्स काढणे अशी कारणे सांगून पैसे उकळायचे. आरोपींनी योगेशला इंडिगो एअरलाईन्समध्ये तिकिटिंग एक्झिक्युटिव्हसाठी निवड झाल्याचे सांगितले होते.

आपली प्रतिक्रिया द्या