
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील दत्तापूर पोलीस व कृषी विभागाने दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात बोगस कपाशीचे बियाणे जप्त करून शहरातील एका कृषी केंद्र संचालकासह तिघांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, शनिवारी दत्तापूर पोलिसांनी अटकेतील कृषी सेवा केन्द्र संचालकाच्या तालुक्यातील कासारखेड येथील शेतामधील गोदामात धाड टाकली असता त्या ठिकाणी मिळालेले साहित्य, रसायन पाहून बनावट बियाणे याच ठिकाणी तयार केले जात असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी ते सर्व साहित्य जप्त केले असून, या कारवाईने तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
गुरूवारी मध्यरात्री दत्तापूर पोलिसांनी तब्बल 9 लाखांचे बोगस बियाणे कासारखेड येथील चारचाकी वाहनातून जप्त केले होते. या प्रकरणात पोलिसांनी कृषी सेवा केंद्र संचालक असलेल्या रामेश्वर चांडकला अटक केली आहे. तसेच या बोगस बियाण्यांचा साठा चांडकनेच हिंगणगाव येथे ठेवला होता आणि कृषी विभाग व पोलिस कारवाईच्या भीतीनेच हा साठा बाहेर काढून पुलगाव परिसरात पिकअप वाहनाने(क्रमांक एम.एच.32-0275) घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान त्याचवेळी दत्तापूर पोलिसांनी वाहनचालक व कृषि सेवा केन्द्र संचालक रामेश्वर चांडक यांना अटक केली होती. दरम्यान न्यायालयाने शनिवारी या दोघांनाही रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडी दरम्यान चौकशीतून रामेश्वर चांडक कपाशीच्या कच्चा मालावर (सरकी) रासायनिक प्रक्रिया करून बनावट बियाणे तयार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
चांडकने कासारखेड येथील शेतात असलेल्या गोदामात हा बोगस बियाणे तयार करण्याचा अवैध कारखाना तयार केला आहे. सदर ठिकाणी बनावट बियाणे तयार करण्याचा प्रकार सुरू होता. लॉकडाऊनमध्येही या ठिकाणी कच्च्या मालावर प्रक्रिया व पॅकिंगचे काम सुरू होते. या ठिकाणी बनावट कपाशी बियाण्यांचे हजारो पाकिटे तयार करण्यात आली. सदर पाकिटांवर कोणताही पत्ता, उत्पादन तिथी किंवा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे अशा बनावट बियाण्यांची निर्मिती करून ते शेतकऱ्यांना विक्री करण्याचा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचे दत्तापूर पोलिसांनी सांगितले आहे. दत्त्तापूरचे एपीआय मिलिंद सरकटे, मंगेश लकडे व उमेश वाघमारे यांनी शनिवारी मंडळ कृषी अधिकारी क्रांती पाटील व कृषी सहायक व्ही. सोनवणे यांच्या उपस्थितीत चांडकच्या गोदामातून आठ पोती बियाण्यांचा कच्चा माल (सरकी), रासायनिक औषधी, पाकिटे आदी साहित्य जप्त केले आहे.
कासारखेड येथील गोदामातून कपाशीच्या बियाण्यांच्या कच्चा मालाची पोती, पॅकिंग मशीन, काही किरकोळ वस्तू व बीज प्रक्रियेसाठी वापरले जाणारे रेनो कंपनीचे औषध पोलिसांनी जप्त केले आहे. चांडक स्वतःच्या शेतात बनावट बियाण्यांची पाकीट तयार करत असल्याचे तपासात समोर आले. कासारखेड येथील गाव खारीला लागून असलेल्या शेतातील गोदामात हा कारखान्याप्रमाणेच सर्व प्रकार आढळून आला. शनिवारी आम्ही सरकारी पंचांसमक्ष बियाणे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, मशीन व प्रक्रिया औषधी ताब्यात घेतली आहे.
भागीदारांचा शोध सुरू
मोठ्या प्रमाणात कपाशीच्या बोगस बियाण्यांची विक्री तालुक्यातून होत होती. पोलिसांनी कृषी केंद्र संचालक रामेश्वर चांडक यांना अटक करून चांडकचे आणखी काही भागीदार आहे का? याबाबत पोलिस तपास करत आहेत.

























































