नगरमध्ये बनावट नोटांचा अड्डा उद्ध्वस्त: दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगर शहरातील वंजार गल्ली परिसरात शुक्रवारी सायंकाळी उशीरा शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकांने बनावट नोटा तयार करणाऱ्या दोघांना साहित्यासह रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याकडून 500 रुपयांच्या 41 हजार 500 रुपये किमतीच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. नवीन नोटा चलनात आल्यापासून नगरमध्ये ही पहिलीच कारवाई आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

शुक्रवारी वंजारगल्ली भागात किरकोळ कारणावरून तरुणांच्या गटात राडा झाला. यामुळे या भागात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या भागातील कायदा आणि सुव्यवस्था राखताना शहर पोलीस उपअधीक्षक मिटके यांनी या भागात बनावट चलनी नोटा तयार करणारा कारखाना असल्याची टिप मिळाली आणि त्यांनी हा अड्डा उद्ध्वस्त केला आहे.

यावेळी नोटा तयार करण्यासाठी आवश्यक असणारा कागद, प्रिटींगचे साहित्य आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. मुकेश अशोक फंड (वय 40,रा. वंजार गल्ली ), संतोष प्रभाकर धीवर (वय 33, रा. वंजार गल्ली) अशी दोघांची नावे आहेत. आरोपींकडून अन्य माहिती घेण्यासोबत याप्रकरणात आणखी कोणकोण आहेत, याचा शोध पोलिसांकडून घेण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांच्या कारवाईत 2 हजार आणि 500 रुपयांच्या 41 हजार 500 रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सदर आरोपीं विरोधात भा.दं.वि. कलम 489 (अ)(क)(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.