राजभवनात बोगस ‘डॉक्टरेट’चे वाटप, अधिकाऱयांवर कारवाईची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ‘राजभवना’चे दार सर्वसामान्यांसाठी उघडले खरे, पण त्याचाच गैरफायदा घेत राजभवनात चक्क बोगस ‘डॉक्टरेट’चे वाटप झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. गंभीर बाब म्हणजे कोरोना योद्धय़ांचा सत्कार करताना राज्यपालांच्याच हस्ते या डॉक्टरेटचे वाटप करण्यात आले.

राजभवनात 8 नोव्हेंबर 2021 रोजी महात्मा गांधी पीस फाउंैडेशन या ओडिशातील एका संस्थेने कार्यक्रम आयोजित केला होता. ही संस्था बोगस पीएच.डी. प्रदान करण्यात बदनाम असून ओडिशातील पोलीस आयुक्तच नव्हे तर पंतप्रधान कार्यालयाकडेही या संस्थेच्या गैरकारभाराच्या तक्रारी झाल्या आहेत. असे असतानाही राजभवनातील काही अधिकाऱयांनी सदर संस्थेच्या कार्यक्रमास परवानगी दिली आणि राज्यपाल कोश्यारीही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.

कोरोना योद्धय़ांचा सत्कार आणि ‘डॉक्टरेट’ प्रदान असे या कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट होते. व्यासपीठावर तसे ठळकपणे नमूदही करण्यात आले होते. ‘डॉक्टरेट’ हा शब्दप्रयोग म्हणजे दिशाभूल होती हे नंतर स्पष्ट झाले. कारण या कार्यक्रमात संस्थेतर्फे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना चक्क पीएच.डी. प्रदान करण्यात आली. एखाद्या विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात जसे विद्यार्थी खास गणवेशात हजर असतात तसेच विद्यार्थी येथेही हजर होते.

सारे काही बनावट

कोणत्याही खासगी संस्थेला पीएच.डी. प्रदान करण्याचा अधिकार नाही. तो अधिकार फक्त विद्यापीठांना असल्याचे यूजीसीने स्पष्ट केले आहे, मात्र तरीही राजभवनात असा प्रकार घडला याबद्दल आता संताप व्यक्त होत असून संबंधित अधिकाऱयांवर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार

‘महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंैडेशन’ या एनजीओमार्फत सोशल मीडियावर अवघ्या पाच हजार रुपयांत ‘डॉक्टरेट’ दिली जाते अशी तक्रार 15 जून 2020 रोजी गुवाहाटीच्या पोलीस आयुक्तांकडे दाखल झाली होती. एवढेच नव्हे तर न्यूज पेपर असोसिएशन ऑफ इंडियाच्या नॉर्थ ईस्ट विभागाचे सचिव मनोजित सिंघा यांनी या संस्थेच्या बोगसगिरीविरुद्ध थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली होती. (PMOPG/E/2020/0501276 dated 15/06/2020)