लोकलसाठी बनावट ओळखपत्राचा आधार; मध्य आणि पश्चिम रेल्वेची कारवाई सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपनगरीय लोकलमधून सर्वसामान्यांना प्रवेशबंदी घातली आहे. तिकीट खिडकीवर ओळखपत्र दाखवूनच तिकीट मिळत असल्याने अनेकजण विनातिकीट प्रवास करीत आहेत. काही जण बनावट ओळखपत्राचा वापर करीत आहेत. अशा प्रवाशांविरोधात रेल्वेने मोहीम उघडली असून पश्चिम रेल्वेने 1 एप्रिल ते 25 जूनपर्यंत अशा तीन महिन्यांत 740 केसेस दाखल करीत 3 लाख 70 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर मध्य रेल्वेने 1 ते 16 जूनपर्यंत पंधरवडय़ातच 702 केसेस दाखल करीत 3 लाख 51 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कोरोनाच्या दुसऱया लाटेनंतरच्या निर्बंधांमुळे उपनगरीय लोकलमधून सर्वसामान्यांना प्रवेशबंदी घातली आहे. केवळ अत्यावश्यक वर्गातील प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर 7 लाख 82 हजार 247 अत्यावश्यक वर्गातील प्रवासी प्रवास करीत आहेत. तर मध्य रेल्वेवर 10 ते 11 लाख प्रवासी प्रवास करीत आहेत.

मध्य रेल्वेवर वर्षभरात बनावट ओळखपत्र प्रकरणात एकूण 2719 केसेस दाखल होऊन 13 लाख 60 हजार 465 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, आरपीएफने विनातिकीट प्रवास करणाऱयांविरुद्ध एप्रिल ते 25 जूनपर्यंत 740 केसेस दाखल करीत 3 लाख 70 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. बनावट ओळखपत्राच्या 52 केसेस दाखल करीत तीन प्रवाशांना दोषी ठरवत त्यांच्याकडून 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. बनावट ओळखपत्र वापरून प्रवास करणाऱया प्रवाशांवर 500 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो किंवा रेल्वे कायदा कलम 143 नुसार त्यांच्यावर खटला दाखल केला जाऊ शकतो. त्यामुळे अत्यावश्यक वर्गातील प्रवाशांशिवाय अन्य प्रवाशांनी लोकल प्रवास टाळावा, असे आवाहन मध्य आणि पश्चिम रेल्वेने केले आहे.