पोलीस असल्याची बतावणी करत पैसे उकळण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑलाईन । मुंबई

कामधंदा काही नाही, त्यात पैशांची प्रचंड तंगी… त्यामुळे करायचे काय असा विचार करत असताना क्राइम पेट्रोल बघून दोघांनी आयडिया केली. भाड्याने पोलिसांचे दोन ड्रेस घेतले आणि ते घालून सोन्याचे दागिने बनविण्याच्या एका दुकानात घुसले. तुमच्याकडे दुकानाचे लायसन्स नाही अशी दमदाटी करीत पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा अभिनय दोघे उत्तम करीत होते. तेवढय़ात तेथून जाणाऱ्या एका पादचाऱ्याने त्यांचे पितळ उघडे पाडले आणि दोघे भामटे गजाआड गेले.

हर्ष उमेश सकारिया (30) आणि हुसेन शेख (34) अशी त्या दोघा भामटय़ांची नावे आहेत. पायधुनी परिसरातील सारंग मार्गावर असलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर अमितेश चुनीचरण (33) याचा सोन्याचे दागिने बनविण्याचा गाळा आहे. हर्ष आणि हुसेन दोघेही पोलिसांची वेशभूषा करून अमितेशच्या गाळय़ात घुसले आणि तुझ्याकडे दुकानाचे लायसन्स नाही हा विषय काढून चर्चा सुरू केली. दरम्यान, गाळय़ाबाहेरून जाणाऱ्या एका पादचाऱ्याने दोघांना पाहिले आणि हे पोलीस नसल्याचे त्याने अमितेशला सांगितले. आपली पोलखोल झाल्याचे कळताच सकारिया याने तेथून लगेच पळ काढला, तर हुसेनला तेथील लोकांनी पकडून पायधुनी पोलिसांच्या ताब्यात दिले. 16 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला होता तेव्हापासून सकारिया फरार होता. पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. अखेर 17 डिसेंबरला हर्ष सकारिया याच्यादेखील आम्ही मुसक्या आवळल्या असे पायधुनी पोलिसांनी सांगितले.

अशी झाली मैत्री

काही महिन्यांपूर्वी नागपाडा परिसरात एका दुकानातून सिगारेट चोरून पळत असताना हुसेन शेखला लोकांनी पकडले होते. त्यावेळी सकारिया याने मध्यस्थी करीत हुसेनची सुटका केली. त्यानंतर दोघांची मैत्री झाली. क्राइम पेट्रोल पाहिल्यानंतर आपणदेखील असे काही तरी करून झटपट पैसा कमवूया अशी आयडिया सकारियाच्या डोक्यात आली. मग दोघांनी सराफाला लुटण्याचा कट रचला पण तो फसला.