
महागाव रोडवरील रिस्पॉन्सिव्ह कंपनीच्या गोदामात आज दुपारी सवाचार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत चार कामगार जखमी झाले असून त्यापैकी तीन गंभीर जखमींना तातडीने ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटर येथे हलवण्यात आले आहे. तर एकावर बोईसरमधील आनंद रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आगडोंबमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी बराच वेळ प्रयत्नांची शर्थ करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आग लागल्याची माहिती मिळताच तारापूर एमआयडीसी अग्निशमन दल आणि बोईसर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र कंपनीच्या गोदामात साठवलेल्या ज्वलनशील कच्च्या मालामुळे काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले. आग इतकी वेगाने पसरली की ती थेट दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली. सायंकाळपर्यंतही आग पूर्णपणे नियंत्रणात आली नव्हती.
घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाने धाव घेऊन प्राथमिक बचावकार्य केले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आगीमुळे कंपनीच्या इमारतीचे आणि यंत्रसामग्रीचे मोठे नुकसान झाले आहे. बेटेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रिस्पॉन्सिव्ह कंपनीत काही महिन्यांपूर्वीही आग लागली होती. वारंवार घडणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे या औद्योगिक परिसरातील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



























































