वृद्धांना लुटणारी बोलबच्चन गँग गजाआड, दीडशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले

रस्त्याने जाणाऱया वृद्धांना बोलबच्चन देऊन सोन्याचे दागिने घेऊन पळ काढणाऱया तिघांना आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली. रामलाल चुनीलाल राठोड ऊर्फ गबरा, धर्मा ऊर्फ बुचा सोळंकी आणि लक्ष्मण शामू देवरस अशी त्या तिघांची नावे आहेत. फसवणूक करण्यासाठी लक्ष्मणने रामलाल आणि धर्माला एका महिलेच्या मदतीने दिल्लीहून मुंबईत बोलावले होते.

तक्रारदार या ज्येष्ठ नागरिक असून त्या भायखळा परिसरात राहतात. 2 सप्टेंबरला त्या मंदिरात जात होत्या. तेव्हा फरार आरोपीने तक्रारदारांना रस्त्यात थांबवले. बोलण्यात गुंतवून ठेवल्यानंतर रामलाल आणि धर्मा तेथे आले. त्या तिघांनी महिलेला बोलबच्चन देऊन महिलेचे 2 लाख 46 हजार रुपयांचे दागिने घेऊन पळ काढला. फसवणूक झाल्याप्रकरणी महिलेने आग्रीपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. परिमंडळ-3 चे पोलीस उपायुक्त परमजित सिंह दहिया यांनी तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक श्रीराम कोरेगावकर यांच्या पथकातील सहायक निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक अभिजित टेकवडे, मंडलिक, खानविलकर, चरंडे, गोडसे, शिंदे, रणदिवे यांच्या पथकाने तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी महालक्ष्मी ते कुलाबा या परिसरातील दीडशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणाहून 6 टॅक्सी पकडल्या होत्या. त्या टॅक्सीचालकांची पोलिसांनी चौकशी केली. चौकशीदरम्यान पोलिसांना ठाणेच्या साठेनगर येथील एका फुटेजमध्ये रामलाल आणि धर्मा हे फोनवर बोलताना दिसले. त्यानंतर पोलिसांनी साठेनगर, इंदिरानगर, रूपादेवी पाडा येथे फिल्डिंग लावली व त्या तिघांना ताब्यात घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या