
बॉलीवूडच्या अनेक दिग्गज अभिनेत्रींचे कथ्थक गुरू आणि अभिनेते वीरू कृष्णन यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बॉलीवूडवर शोककळा पसरली असून सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत वीरू यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कथ्थक नृत्यात पारंगत असलेल्या वीरू कृष्णन यांनी छोटय़ा आणि मोठय़ा पडद्यावरील अनेक कलाकारांना कथ्थकचे धडे दिले होते. यामध्ये कतरिना कैफ, अथीया शेट्टी, करणवीर बोहरा, लारा दत्ता यांचा समावेश होता. ‘राजा हिंदुस्थानी’, ‘हम है राही प्यार के’, ‘इश्क’सारख्या काही चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनयाची चुणूकदेखील पाहायला मिळाली.
प्रियांकाने ट्विटरद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘जेव्हा मी नीट नाचूदेखील शकत नव्हते तेव्हा तुम्ही मला कथ्थक शिकवले. नृत्यासाठी असलेला तुमचा संयम आणि जिद्द पाहून आम्ही केवळ कथ्थकच नाही तर तुमच्याकडून खूप साऱया गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला. तुम्ही कायम स्मरणात राहाल, गुरुजी,’ अशा शब्दांत प्रियांकाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

























































