
अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी आकाशदीप करज सिंग याला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. या हत्या प्रकरणात जामीन मिळवणारा आकाशदीप हा पहिला आरोपी ठरला आहे.
न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने आकाशदीप सिंगला जामीन देताना काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. जोपर्यंत या प्रकरणाचा खटला पूर्ण होत नाही, तोपर्यंत आकाशदीपला मुंबई सोडून जाता येणार नाही, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. सुनावणी दरम्यान न्यायालयाने सरकारी पक्षाला आकाशदीपच्या या गुन्ह्यातील भूमिकेबाबत प्रश्न विचारले होते. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, सध्याच्या टप्प्यावर जामीन दिल्यास तपासात कोणताही अडथळा येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने हा निर्णय दिला.
याप्रकरणी आकाशदीप सिंगला नोव्हेंबर २०२४ मध्ये पंजाबमधून अटक करण्यात आली होती. त्याने आपल्या जामीन अर्जात दावा केला होता की, त्याला या प्रकरणात विनाकारण गोवण्यात आले आहे. त्याच्यावर केवळ संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य असल्याचा आरोप आहे, परंतु हत्येच्या कटात त्याची कोणतीही विशिष्ट भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. तसेच खटला सुरू होण्यास विलंब होत असल्याने प्रदीर्घ काळ तुरुंगात ठेवणे हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचेही त्याने म्हटले होते.
दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत २६ जणांना अटक केली असून त्यांच्यावर’मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या आरोपपत्रात लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला मुख्य सूत्रधार असल्याचे नोंदवण्यात आले आहे.























































