ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट विभाग सुरू करणार; यॅलेसेमिया रुग्णांना मोठा दलासा

लवकरच बोन मॅरो ट्रान्सप्लांट विभाग सुरू करण्यात येणार आहे. सिव्हिल सर्जन डॉ. कैलास पवार यांनी ही घोषणा केली असून त्यामुळे थैलेसेमिया रुग्णांना मोठा दिलासा मिळेल. या विभागात अत्याधुनिक साधनसामग्री तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार आहे.

नौपाडा येथील हितवर्धिनी सभेच्या सभागृहात वामनराव ओक रक्तपेढी केंद्राच्या वतीने ‘थलेसेमियामुक्त महाराष्ट्र’ या महत्त्वाच्या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन डॉ. कैलास पवार यांच्या हस्तेझाले. यावेळी बोलताना त्यांनी सरकारी यंत्रणा तसेच आरोग्य क्षेत्रात काम करीत असलेल्या सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन यॅलेसेमियाबाबत जनजागृती करावी असे आवाहन केले.

ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट विभाग सुरू करण्यात येणार असल्याचे सांगत पवार यांनी यॅलेसेमियाबाबत माहितीदेखील दिली. यावेळी व्यासपीठावर डॉ. केंद्रे, जनकल्याण समितीच्या थैलेसेमिया प्रकल्पाचे प्रमुखा डॉ. आशुतोष काळे, जनकल्याण समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष अजित मराठे, वामनराव ओक रक्तपेढीचे अध्यक्ष किरण वैद्य आदी उपस्थित होते.

14 रक्तपेढ्यांमार्फत जनजागृती
यॅलेसेमियाबाबत उपचार, नियंत्रण व काळजी या त्रिसूत्रीवर आधारित जनकल्याण समितीच्या 14 रक्तपेढ्यांमार्फत जनजागृती अभियान सुरू असल्याची माहिती प्रकल्पाचे प्रमुख डॉ. काळे यांनी दिली. यावेळी अनेक तज्ज्ञ डॉक्टर, संशोधक, विविध सामाजिक संस्था, थैलेसेमियाचे रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.