वास्तवाशी मेळ साधणाऱया कथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नमिता दामले

अनामिक’ हा वैशाली काटकर यांचा पहिलाच चार दीर्घकथांचा संग्रह आहे. असे असूनही लेखिकेचा नवखेपणा अजिबात जाणवत नाही. विविध जबाबदाऱया आणि विविध छंद जोपासत देश-विदेशात वास्तव्य करणाऱया या लेखिकेचे भावनाविश्व आणि अनुभवविश्व संपन्न आणि प्रगल्भ असल्याचा प्रत्यय या कथांमधून आपल्याला येतो.

‘काही नाती जपाचयी असतात, फुलासारखी…’ या हळुवार नात्यांच्या धाग्या-दोऱयांना कुठेही गाठ बसू नये, पीळ पडू नये यासाठी या नात्यांमधली ओढ, विश्वास आणि माया जपावी लागते. गैरसमजांना दूर ठेवून एकमेकांना जाणावे लागते. आयुष्याच्या प्रवासात अनेक मित्र-मैत्रिणी भेटतात आणि हळुवार भावबंध आणि अनामिक नात्यांनी जोडले जातात. परंतु ज्याच्याशी आपला प्रत्येक श्वास जोडलेला असतो त्या आपल्या माणसाला प्राणापलीकडे जपायचे असते. ‘तुझ्या-माझ्यात’ही कथा हातातून निसटून जाणाऱया सुक्या वाळूचा आणि हातावर ठसा सोडणाऱया ओल्या वाळूचा दाखला देत नात्यांची गणिते घालत जाते.

‘गेले ते दिन गेले’ या कथेचा विषय आणि वातावरण दोन्ही हलके-फुलके आहे. काळाचा पल्ला मोठा असला तरी चार मैत्रिणींच्या बंधांमध्ये तो घट्ट बांधलेला आहे. या चौघींची मैत्री दृष्ट लागण्यासारखी आहे, पण तरी ही कथा काहीशी कृत्रिम वाटते. ‘लपंडाव’मध्ये आधुनिक काळातील व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समानता (की असमानता स्वातंत्र्य आणि स्वैराचार, नात्यांमधील मर्यादा, बंधने आणि जबाबदाऱया असे अनेक पदर आहेत. ही कथा बरेच प्रश्न उपस्थित करते आणि वास्तवात त्यांची उत्तरे तितकी सोपी नसतात.

‘रियुनियन’ ही कथा फारच भावून जाते. डोळय़ांतून टचकन पाणीही काढते. पण खरंच असे कधी होऊ शकते का, की परिस्थितीशी तडजोड करत मार्ग काढता – काढताच आयुष्य संपून जाते. या कथांमधील प्रसंग आपणही कधीतरी अनुभवले असले तरी वास्तव आणि कल्पना यांच्यात कधीच मेळ नसतो, म्हणूनच त्या स्वप्नाळू भासतात.

‘अनामिक’
लेखिका ः वैशाली फाटक-काटकर
प्रकाशक ः अभिषेक पब्लिशर्स, पुणे
पृष्ठ ः 229 मूल्य ः 250 रुपये