बखर एका शिक्षकाची, नटाची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>मल्हार कृष्ण गोखले

विनोदसम्राट आचार्य अत्रे यांच्या ‘साष्टांग नमस्कार’ या तुफान विनोदी नाटकातले एक पात्र म्हणते, ‘नुसते सृष्टीसौंदर्य पाहून का चांगली कविता सुचते? तसे असते तर कावळय़ांनासुद्धा काव्य स्फुरले असते. त्यांना नाही का सपाटून सृष्टीसौंदर्य पाहायला मिळते?’

माणसे जन्माला येतात, जगतात. एखाद्या विशिष्ट कालखंडात घडणाऱ्या लहान-मोठय़ा घटना, त्या कालखंडात जगणारी सगळीच माणसे पाहात असतात, अनुभवत असतात. पण म्हणून, त्यांना सगळय़ांनाच काही त्या काळाच्या, समकालीन माणसांच्या, घटनांच्या आठवणी सांगणे, लिहिणे जमेलच असे नाही. ते जमण्यासाठी मुळात त्या सांगणाऱ्या माणसाकडे गोष्टीवेल्हाळपणा हा गुण हवा. प्रस्तुत ‘रमलो मी’ या आत्मचरित्र किंवा आठवणींचे लेखक श्रीराम रानडे यांच्याकडे तसा तो गुण आहे. त्यामुळे त्यांच्या या आठवणी म्हटले तर त्यांच्या एकटय़ाच्या आहेत, म्हटले तर त्यांच्या समकालीन माणसांच्या घटनांच्या आहेत. अशा आठवणींनाच पूर्वी आपल्याकडे बखर म्हणत असत. पश्चिमी साहित्यात त्यांना ‘रेमिनिसन्स’ असे म्हटले जाते. सामाजिक इतिहासात या ‘रेमिनिसन्स’ना महत्त्वाचे स्थान आहे. उदा. दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास स्वतः विन्स्टन चर्चिलनेच लिहिला आहे. त्यामुळे त्या कालखंडात ब्रिटन आणि अन्य युद्धमान राष्ट्रांच्या सर्वोच्च राजकीय नि सैनिकी पातळीवर काय घडत होते, हे आपल्याला समजते. पण सर्वसामान्य जनतेची काय स्थिती, मनःस्थिती आणि परिस्थिती होती, हे कसे कळणार? त्यासाठी समाजातल्या वेगवेगळय़ा स्तरांवर वावरणाऱ्या असंख्य सर्वसामान्य लोकांच्या आठवणी, वृत्तांत, दैनंदिनी उपयोगी पडतात. युरोप-अमेरिकेतल्या असंख्य सामान्य लोकांनी तशा आठवणी लिहिल्या आहेत. त्या वाचून आपल्यासमोर तत्कालीन समाजस्थितीचे चित्र उभे राहाते.

श्रीराम रानडे यांचा जन्म 1939 साली मिरजेला झाला. मिरज-सांगली ही जवळ जवळची संस्थानी गावे. ब्रिटिश अंमलातल्या मुंबई-पुण्यात आणि सांगली, मिरज, कोल्हापूर, नागपूर अशा अस्सल मराठी संस्थानांच्या वातावरणातच एक मूलभूत फरक होता. इथे रानडे जेव्हा आपल्या बालपणीच्या घटनांचे, माणसांचे, ठिकाणांचे वर्णन करतात, तेव्हा त्या वातावरणाचा एक सुंदर ‘फील’ वाचकाला येतो. कित्येकदा तर असे वाटून जाते की, आपण रानडय़ांचे लिखाण वाचतो आहोत की, व्यंकटेश माडगूळकरांचे? तात्पर्य, मराठी मातीचा तो अस्सल गंध रानडय़ांनी अचूक पकडला आहे. किंबहुना तो मुळातच त्यांच्या शब्दांना आहे.

लेखक आणि वाचक यांचे नाते गायक आणि श्रोत्यासारखेच असते. पहिल्या समेवरच गायकाने एकदा श्रोत्यांची दाद मिळवली की, पुढची मैफल रंगतेच. नशीब काढण्यासाठी कोकणी माणूस मुंबईला जातो, तसा घाटावरचा माणूस पुण्याला जातो. तसेच गांधीवधोत्तर दंगलींमध्ये चटका खाल्लेले रानडे मिरजेहून पुण्याला आले. अनेक बारीक-सारीक उद्योग करीत शेवटी एका शाळेत शिक्षक म्हणून स्थिरावले आणि ती नोकरी करतानाच नाटकातून कामे करू लागले. सर्वसामान्य प्रेक्षकांना नाटय़-चित्रपटातले हीरो आणि फार तर व्हीलनची नावे माहीत असतात. पण दुय्यम वाटणाऱया भूमिकाही महत्त्वाच्या असतातच. त्या जाणकारीने, सशक्तपणे वठवणारे नट रसिक पेक्षकांच्या लगेच नजरेत भरतात. खरे रसिक अशा नटांचीही आवर्जून ओळख घेतात. श्रीराम रानडय़ांनी अशा असंख्य नाटकांमधून उत्तम भूमिका केल्या आहेत. त्यांचे सर्वात गाजलेले नाटक म्हणजे ‘घाशीराम कोतवाल.’ घाशीराममधला सूत्रधार म्हणजेच श्रीराम रानडे. घाशीरामची संहिता कितीही वादग्रस्त असो; पण त्याचे दिग्दर्शन, नृत्यदिग्दर्शन, संगीत आणि अभिनय हे सगळेच अत्यंत दर्जेदार, अभिनव होते यात वाद नाही. घाशीराम बसवले जात असतानाच्या आणि नंतर प्रयोगाच्या दिवसांमधल्या रानडे यांच्या आठवणी वाचनीय.

एकंदरीत, उद्याचा सामाजिक इतिहास लिहिणाऱयांना, महाराष्ट्राच्या गेल्या सुमारे 100 वर्षांतल्या सामाजिक घडामोडींचे भान येण्यासाठी या आठवणी, ही बखर, हे ‘रेमिनिसन्स’ निश्चितच उपयुक्त आहे.
पुस्तकाची निर्मितीमूल्ये उत्कृष्ट. मुखपृष्ठ, रेखाचित्रे, छायाचित्रे, मांडणी, मुद्रण सगळेच नेत्रसुखद. आपल्या वैयक्तिक आठवणींमध्ये तिऱ्हाईत वाचकालासुद्धा गुंग करता येते, हे दाखवणारा एक स्तुत्य आदर्श.

रमलो मी
लेखक – श्रीराम रानडे
प्रकाशक – राजहंस प्रकाशन, भारद्वाज प्रकाशन
पृष्ठ – 202, मूल्य -रुपये 225/-