
>> अस्मिता प्रदीप येंडे
नाटक हे अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम आहे. कारण ती दृकश्राव्य कला आहे. अनेक दिग्गज लेखकांनी आपल्या लेखणीने अनेक नाटके लिहून ती अजरामर केली आहेत. नाट्य रसिकांसाठी, नाटक ज्यांचा श्वास आहे, अशांसाठी ज्येष्ठ लेखिका आशा भिडे यांचे ‘लोकांकिका’ हे पुस्तक नाट्यप्रेमींसाठी पर्वणीच आहे. कारण या पुस्तकात एकांकिका, पथनाट्य, नभोनाट्य, नाटिका अशा अनेकविध नाट्यछटा यांची सुरेख पखरण केलेली आहे. नाट्यसंहिता, विविध पात्रे, संवाद, पात्रांचे स्वभाव, वातावरण, घटनाक्रम, प्रसंग, पात्राच्या भावना, वेदना यांची समर्पक रचना या पुस्तकात वाचायला मिळते. साहित्य हे समाज प्रबोधनासाठी निर्माण केले जाते. कारण साहित्यात समाजाचे रूप दिसत असते. त्यांनी ‘लोकांकिका’च्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या लेखणीतून समाज जीवनाचे दर्शन घडते. समाजातील समस्या, व्यक्तीमधली चढाओढ, नात्यांमधील नाजूक बंध या सगळ्यांचे दर्शन या पुस्तकात घडते.
‘स्त्री मुक्ती हवीय! पण कुणापासून’ व ‘डोंट वरी’ या दोन पुरुष पात्रविरहित एकांकिका म्हणजे कुतूहल निर्माण करणाऱ्या आहेत. फक्त स्त्री पात्र असलेल्या एकांकिकेत काय काय घडत असेल, याची कल्पना लेखिकेने करून वास्तव मांडले आहे. समाजातील, नात्यातील वास्तव विनोदी पद्धतीने, मिश्कीलपणे तसेच संवेदनशीलतेने या एकांकिकेमधून दर्शविले आहे.
‘महिला मंडळात कविसंमेलन’ ही नाटिका मनोरंजनात्मक असली तरी स्त्रियांची एकमेकांविरुद्ध असलेली चढाओढ ही साहजिकच दिसून येते. ‘तिन्ही सांजेला हवा सोबती’ या एकांकिकेतून आयुष्यातील एकटेपणात कोणीतरी सोबती हवा, एका ठराविक वयानंतर एकटेपणा जाणवतो, तो दूर करण्यासाठी सोबती हवाच, त्यासाठी वयाची मर्यादा नसावी, ही संवेदनशील आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट यात अधोरेखित केलेली आहे. हल्ली नात्यात व्यवहार आला की, नाती कमकुवत होताना दिसतात. नात्यांचे मोल पैशात मोजता येत नाहीत, पण आजूबाजूला पैशांमुळे नाती तुटताना आपण पाहतो, हेच सत्य ‘नाती पैशाची की प्रेमाची’ या एकांकिकेतून मांडले आहे.
लेखिका आशा भिडे यांच्या साहित्य विश्वातील आणि लेखणीतील अनुभव व्यापक आहे. आपल्या लेखणीतून मनोरंजन आणि प्रबोधन करणे ही त्यांची खासियत आहे. सगळ्या नाट्यछटा एकत्रितरीत्या या पुस्तकात वाचकांना अनुभवायला मिळतील. पुस्तकाची रचना, अक्षरबंध, भाषाशैली समर्पक आहे. एकांकिका सादर करायची असल्यास त्यासाठी योग्य त्या सूचनासुद्धा यात दिलेल्या आहेत आणि असे विविधांगी, काळानुरूप बदललेले विषय रंगभूमीवर येणे आवश्यक आहेत. पुस्तकाचे मुखपृष्ठ ही अगदी यथासांग संदेश सावंत यांनी रेखाटले आहे आणि मलपृष्ठावर प्रकाशक प्रा. संतोष राणे यांनी पुस्तकाबद्दल मार्मिक विवेचन केले आहे. एकंदरीत ही लोकांकिका नक्कीच वाचकांचे लक्ष वेधून घेईल!
लोकांकिका
लेखिका : आशा भिडे
प्रकाशक : शारदा प्रकाशन, ठाणे
मूल्य : रुपये 100/-





























































