पहिल्या महायुद्धाची शताब्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मल्हार कृष्ण गोखले

पहिले महायुद्ध या नावाने ओळखले जाणारे एक अत्यंत भीषण आणि संहारक युद्ध १९१४ ते १९१८ या कालखंडात घडून गेले. मनुष्यप्राण्याची इतकी मोठी कत्तल आणि लष्करी व नागरी साधनसामग्रीचा इतका प्रचंड विध्वंस यापूर्वी मानवाने कधीच अनुभवला नव्हता. म्हणून इतिहासकारांनी या युद्धाला महायुद्ध असे म्हटले. ऑगस्ट १९१४ ते नोव्हेंबर १९१८ अशी सवाचार वर्षे चाललेल्या या युद्धात किमान ९० लाख माणसे प्रत्यक्ष रणांगणावर ठार झाली. बाकी नागरी माणसे आणि घोडे, उंट, खेचरे इत्यादी जनावरे किती मेली याचा हिशेब आजवर लागलेला नाही. हे युद्ध मुख्यतः जर्मनी व ऑस्ट्रो-हंगेरी हा एक पक्ष विरुद्ध फ्रान्स, ब्रिटन, रशिया, अमेरिका हा दुसरा पक्ष यांच्यात झाले.

मुळात ज्या कारणांमुळे युद्ध सुरू झाले, त्यांचा निकाल खुद्द युद्धात आणि युद्धानंतर झालेल्या व्हर्सायच्या तहात लागलाच नाही. त्यामुळे त्या तहातल्या अन्यायकारक अटींमधून आणखी एक महायुद्ध उद्भवले. सप्टेंबर १९३९ ते ऑगस्ट १९४५ अशी तब्बल सहा वर्षे चाललेले ते महायुद्ध अधिकच संहारक आणि भयानक होते. त्याला इतिहासकारांनी दुसरे महायुद्ध असे नाव दिले आहे. २०१४ साली पहिल्या महायुद्धाच्या प्रारंभाला शंभर वर्षे पूर्ण झाली. युरोपातल्या सर्व देशांनी आपापल्या सैन्यातील ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना आदरांजली वाहून ही शताब्दी साजरी केली. शिवाय युरोपातल्या सर्व भाषांमधून नामवंत लेखक, इतिहासकार या महायुद्धाच्या अनेक अज्ञात वा नव्याने उजेडात आलेल्या पैलूंबद्दल उत्तमोत्तम संशोधन ग्रंथ प्रसिद्ध करीत आहेत.

मराठीत ‘पहिले महायुद्ध’ याच नावाचे दोन उत्कृष्ट ग्रंथ उपलब्ध आहेत. एक नाटय़ाचार्य कृष्णाजी प्रभाकर ऊर्फ काकासाहेब खाडिलकर यांचा आणि दुसरा दि. वि. ऊर्फ बंडोपंत गोखले यांचा. हे दोन्ही ग्रंथ युद्ध या विषयाच्या अभ्यासकांनी पुनः पुन्हा वाचावेत इतके दर्जेदार आहेत. प्रस्तुत ‘वेध पहिल्या महायुद्धाचा’ या पुस्तकाचे लेखक, ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत हे स्वतः युद्धेतिहासाचे अभ्यासक आणि साक्षेपी लेखक आहेत. दोन्ही महायुद्धे, शीतयुद्ध, दोन महायुद्धांमधला अस्वस्थतेचा कालखंड अशा विषयांवर त्यांनी आतापर्यंत दर्जेदार पुस्तकेही लिहिलेली आहेत. पहिल्या महायुद्धाच्या शताब्दीच्या निमित्ताने या विषयाचे अवलोकन करताना त्यांना जे. मरे विंटर, डेनिस विंटर, सी. पॉल व्हिन्सेंट, टोनी ऍशवर्थ, एडवर्ड हॅलेट कार, जॉन मेनार्ड केन्स या नामवंत लेखकांची काही पुस्तके मिळाली. युद्धाच्या घटनाक्रमाचे कथानक सांगतानाच राजकारणी, सेनापती, सैनिक आणि सामान्य जनता अशा चार पातळय़ांवर या महायुद्धाकडे कसे पाहता येईल असा विचार त्यांच्या मनात आला. त्यातून प्रस्तुत छोटेखानी, परंतु गुणवान पुस्तकाची निर्मिती झालेली आहे. या युद्धाने विमान, रणगाडा, पाणबुडी आणि मशीनगन या नव्या संहारक शस्त्रांना जन्म दिला. त्याबद्दल परिशिष्टात मुद्दाम विवेचन करण्यात आले आहे. मात्र इतक्या वाचनीय पुस्तकांत मुद्राराक्षसाने इतका धुमाकूळ घातलेला आहे की, वाचकाचा वारंवार रसभंग होतो.

वेध पहिल्या महायुद्धाचा
लेखक – पंढरीनाथ सावंत
प्रकाशक – मनोरमा प्रकाशन
पृष्ठ – १३२, मूल्य – १७५ रुपये