अभिप्राय- ग्रंथ पुरस्काराची उपयुक्त माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>प्रशांत गौतम

कोणत्याही क्षेत्रात पुरस्कारास अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेले असते. विशेषतः साहित्य क्षेत्रात शासकीय-निमशासकीय पुरस्कारांची मोठय़ा प्रमाणात रेलचेल दिसते. पुरस्कार देण्यासाठी आज विविध साहित्य संस्था उत्साहाने पुढाकार घेत असतात. पुरस्काराने पुरस्कारार्थीच्या वाटचालीत काही फरक पडत नसला तरी त्या व्यक्तीचे कार्य हे नित्यनूतन सुरूच असते. आजमितीस आजपर्यंत किती संस्था पुरस्कार देतात. कोणकोणते सरकारी पुरस्कार असतात याची एकत्रित माहिती उपलब्ध झालेली नव्हती. विविध प्रसारमाध्यमांत त्यासंदर्भात काही संक्षिप्त प्रसिद्ध होत असे. मात्र सबकुछ पुरस्काराविषयीच असणारे मराठी ग्रंथ पुरस्कार परिचय या नावानेच पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले. पुण्यातील प्रकाशन विश्व डायरीचे संकलक संपादक मोहन वैद्य यांनी मोठाच पुढाकार घेतला. तसे तर पूर्वी प्रकाशित होत असलेली प्रकाशन डायरी किंवा त्याचेच नवे स्वरूप घेऊन आलेले प्रकाशन विश्व यात काही प्रमाणात पुरस्काराविषयी टिपण प्रसिद्ध होत असे. मात्र मराठी ग्रंथ पुरस्कार परिचय हा ग्रंथ केवळ पुरस्कारांचीच विस्ताराने माहिती देणारा आहे. त्यात शासकीय ग्रंथ पुरस्कार योजना, साहित्य अकादमीचे पुरस्कार, विविध साहित्य संस्था, प्रकाशन संस्था, गंथालये व अन्य गंथ पुरस्कारांची माहिती विस्ताराने देण्यात आली आहे.

प्रकाशन विश्वची गोष्ट

मोहन वैद्य हे ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक आहेत. मराठी, इंग्रजी भाषेतून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 1997 मध्ये नाशिकचा मुक्काम हलवून ते पुणे शहरात स्थायिक होण्यासाठी आले. एके दिवशी कागदपत्रांची पिशवी तपासताना अनेक जुन्या, नव्या मित्रांची खूप पत्रे त्यांच्या हाती लागली. पत्रकारितेच्या निमित्ताने गावोगावी होत असलेल्या भटकंतीत भेटलेल्या किती तरी मित्रांनी त्यांच्या डायरीत फोन क्रमांक लिहून ठेवले होते. पुढे कधी तरी कामातून थोडी सवड मिळाल्यावर त्या पत्रावरचे पत्ते व डायरीतील फोन क्रमांक वैद्य यांनी संगणकावर लिहून काढले. हे काम अखेरच्या टप्प्यात आले तेव्हा वैद्य यांना वाटले की हा तर स्वतंत्र ग्रंथांचाच ऐवज आपल्याकडे जमा झाला आहे.

1998 मध्ये प्रकाशन विश्व या ग्रंथाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. त्यामागील कहाणी अशी आहे- प्रकाशन विश्व 20 ऑगस्ट 2019 या ग्रंथाची आवृत्ती गेल्या वर्षी प्रकाशित झाली आणि तीन महिन्यांत संपली. वीस-एकवीस वर्षे हे विलक्षण ध्यासपर्व अखंडपणे सुरू आहे. एका जाणकार पत्रकाराने सातत्याने केलेल्या या अपूर्व मराठी साहित्य सेवेचा गौरव करावा, असे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजकांना जेव्हा केव्हा वाटेला तो सुवर्णदिन असेल.
सब कुछ पुरस्कारांविषयी

प्रकाशन विश्व या ग्रंथात दरवर्षी काही पुरस्कारांची नोंद आवर्जून केलेली असते. मात्र पृष्ठसंख्येच्या मर्यादामुळे अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांच्या नोंदी नाइलाजाने वगळाव्या लागतात. यावर मार्ग म्हणून मराठीतील विविध साहित्य प्रकाशकांना दिल्या जाणाऱया पुरस्कारांची तपशीलवार माहिती देणारे पुस्तक तयार करण्याचे वैद्य यांनी ठरवले. महाराष्ट्रातील विविध संस्थांशी संपर्क साधून नवनवीन पुरस्कारांची माहिती मिळवली. त्यांचा जनसंपर्क मोठा असल्याने गावोगावच्या मित्रांना देखील त्यांना या कामी आपुलकीने सहकार्य केले. शब्दशः चांद्यापासून ते बांद्यापर्यंतचे असंख्य पुरस्कार मराठी ग्रंथ पुरस्कार परिचय या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. मराठी ग्रंथ पुरस्कार परिचय हे पुस्तक सध्या कमालीचे वाचकप्रिय झाले आहे. आवृत्तीच्या मोजक्या प्रती शिल्लक राहिल्या आहेत.

मोहन वैद्य यांनी आता आणखी एक भव्य उपक्रम हाती घेतला आहे. ‘आधुनिक मराठी साहित्य कोश’ असे या ई-बुकचे स्वरूप असेल. साहित्यिकांच्या सविस्तर परिचयाबरोबरच त्यांच्या सर्व प्रकाशित पुस्तकांचाही व्यापक परिचय या ई-बुकद्वारे वाचकांना होऊ शकेल. मुख्य म्हणजे पृष्ठसंख्येची मर्यादा ई-बुकला नसल्यामुळे ही सर्व माहिती तपशीलवार देणे वैद्य यांना शक्य होणार आहे. हे संकल्पित ई-बुक तयार झाल्यावर त्याच्या प्रती महाराष्ट्रातील व देश-विदेशातील 10 लाखांहून अधिक संस्थांना पाठवणार आहेत. एक माणूस माय मराठीच्या ध्यासातून सातत्याने करीत असलेले हे कार्य थक्क करणारे आहे.

मराठी ग्रंथ पुरस्कार परिचय
संकलक संपादक -मोहन वैद्य
प्रकाशक -प्रकाशन विश्व
मूल्य – 300