यंदा दहावीसाठी जलसुरक्षा अनिवार्य श्रेणी विषय, मात्र छापील पाठय़पुस्तक अद्याप उपलब्ध नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहावीसाठी यंदाच्या वर्षी ‘स्वविकास व कलारसस्वाद’ हा श्रेणी विषय रद्द करून त्याऐवजी ‘जलसुरक्षा’ या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. याबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व शाळांना नुकत्याच लेखी सूचना दिल्या आहेत. मात्र या विषयाचे छापील पाठय़पुस्तक अद्याप उपलब्ध झाले नसून अनेक विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. तसेच आयत्या वेळी मिळालेल्या या सूचनेमुळे हा विषय शिकविण्यासाठी शिक्षकांचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न शाळांना पडला आहे.

चार वर्षांपूर्वी दहावीचा अभ्यासक्रम बदलल्यानंतर ‘जलसुरक्षा’ या विषयाचा श्रेणी विषय म्हणून समावेश करण्यात आला होता. यानुसार काही शाळांमध्ये हा विषय विद्यार्थ्यांना पर्याय म्हणून देण्यात आला होता. यंदा मात्र शिक्षण मंडळाने परिपत्रक काढून ‘जलसुरक्षा’ हा विषय अनिर्वाय असल्याचे सांगितले आहे. पण हे परिपत्रक शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर इतक्या उशिरा काढल्याबद्दल काही शाळांनी नाराजी व्यक्त केली आहे. विषय बदल शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी करणे अपेक्षित असते. तसेच याबाबत शिक्षकांचे प्रशिक्षण होणेही आवश्यक आहे. मात्र हे काहीच झाले नाही असा आरोप शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केला आहे.