
एटीपी टूरवर प्रथम जोडी बनवून खेळलेले रोहन बोपन्ना व रामपुमार रामनाथन या हिंदुस्थानी जोडीने अॅडलेड एटीपी टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. बिगरमानांकित हिंदुस्थानी जोडीने किताबी लढतीत क्रोएशियाचा इवान डोडिंग व ब्राझीलचा मार्सेलो मेलो या अव्वल मानांकित जोडीचा पराभव करून जेतेपदावर नाव कोरले हे विशेष.
बोपन्ना-रामपुमार जोडीने अंतिम लढतीत डोडिंग-मेलो जोडीचा एक तास 21 मिनिटांपर्यंत रंगलेल्या लढतीत 7-6 (6), 6-1 असा पराभव केला. हिंदुस्थानी जोडीने लढतीच्या सुरुवातीलाच ब्रेक पॉइंट वाचवून सुरेख खेळ केला. सातव्या गेममध्ये मेलो 30-0 वर सर्व्हिस करत असताना बोपन्नाने डोडिंगच्या उजवीकडे रिटर्न सर्व्हिस करून गुण मिळविले, तर पह्रहॅण्ड विनर लगावत 30-30 अशी बरोबरी साधली, मात्र ब्राझीलचा खेळाडू सर्व्हिस वाचविण्यात यशस्वी ठरला. बोपन्नाने पुढच्या गेममध्ये ब्रेक पॉइंट वाचवून अन् सर्व्हिस राखून 4-4 अशी बरोबरी साधली. नंतर रामपुमारने 5-6 च्या स्कोअरवरून आपली सर्व्हिस राखत पहिला सेट ट्रायब्रेकमध्ये नेला. बोपन्नाने 6-6 बरोबरीनंतर मेलोच सर्व्हिस रिटर्नवर गुण मिळवत पहिला सेट जिंकला, मात्र दमछाक झालेल्या क्रोएशिया-ब्राझील जोडीचा दुसऱ्या सेटमध्ये हिंदुस्थानी जोडीपुढे निभाव लागला नाही.
बोपन्नाचे हे कारकिर्दीतील विसावे एटीपी दुहेरीचे विजेतेपद असून रामपुमारच्या साथीतील पहिलेच विजेतेपद होय. रामपुमार तर या स्तरावर केवळ दुसऱयांदाच अंतिम लढत खेळला. 2018 मध्ये ‘हॉल ऑफ फेम टेनिस’ चॅम्पियनशिपमध्ये तो उपविजेता ठरला होता. या विजेतेपदामुळे रामनाथन रामपुमारला ऑस्ट्रेलियन ओपनच्या पात्रता फेरीपूर्वी आत्मविश्वास उंचावण्यास मदत होणार आहे.
‘रामपुमार सर्व्हिस करत असताना लवकर गुण मिळवण्याची संधी असते. डावखुऱ्या दिविज शरणच्या तुलनेत रामपुमारच्या साथीत खेळणे थोडे वेगळे आहे. दिविजच्या साथीने गुण मिळवण्यासाठी संधी मिळवावी लागते, मात्र रामपुमारसोबत खेळताना ती संधी लवकर चालून येते. त्यामुळे किताबी लढतीत विजेतेपदापर्यंत पोहोचता आले.’
रोहन बोपन्ना




























































