ब्रेक्झिट समर्थक बोरिस जॉन्सन ब्रिटनचे नवे पंतप्रधान

33

सामना ऑनलाईन । लंडन

लंडनचे माजी महापौर ब्रेक्झिट समर्थक बोरिस जॉन्सन यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. ब्रेक्झिट करारावर निर्माण झालेल्या संभ्रमानंतर थेरेसा मे यांनी 7 जूनला पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी आणि सत्तारूढ कंझर्वेटीव्ह पक्षाच्या नेतेपदासाठी सोमवारी निवडप्रक्रिया झाली. मतदान प्रक्रियेदरम्यान जॉन्सन आघाडीवर होते. ब्रिटनच्या संविधानानुसार बहुमत असलेल्या पक्षाच्या नेत्याची पंतप्रधानपदी निवड करण्यात येते. बोरिस जॉन्सन बुधवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. यापूर्वी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभारही सांभाळला आहे.

कंझर्वेटीव्ह पक्षाच्या नेतेपदासाठी सोमवारी झालेल्या निवडप्रक्रियेत जॉन्सन यांना 92,153 ( सुमारे 66 टक्के) तर त्यांचे प्रतिस्पर्धी जेरमी हंट यांना 46,656 मते मिळाली. एकूण सदस्यांपैकी 87.4 टक्के सदस्यांनी मतदान केले. जॉन्सन ब्रेक्झिटचे समर्थक असून त्यांनी यासाठी मोहीम सुरू केली होती. राजीनामा दिल्यानंतर थेरेसा मे सभागृहाला संबोधित करणार आहेत. त्यानंतर राणी एलिझाबेथ द्वितीय यांना भेटून त्या राजीनामा सादर करतील. ब्रेक्झिट करारावरून ब्रिटनमध्ये संभ्रमाचे वातावरण असताना जॉन्सन पदभार सांभाळत आहेत. त्यामुळे ब्रेक्झिटसह अनेक आव्हाने त्यांच्यासमोर आहेत. जॉन्सन पंतप्रधान झाल्यास पदाचा राजीनामा देण्याचा इशारा अनेक मंत्र्यांनी याआधीच दिला आहे. जॉन्सन यांच्यासोबत आपण काम करू शकत नसल्याने राजीनामा देणार असल्याचे चान्सलर फिलिप हॅमंड यांच्यासह अनेक कॅबिनेट मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या