
पैसे दुप्पट करण्याच्या नावाखाली चोरटयाने पैसे घेऊन पळ काढल्याची घटना बोरिवली रेल्वे पादचारी पुलावर घडली. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार हे बोरिवली पूर्व येथील एका दुकानात काम करतात. तीन दिवसांपूर्वी तक्रारदार यांना त्याच्या मालकाने भाडय़ाची रक्कम दिली होती. ती रक्कम तक्रारदार हे एटीएममध्ये भरण्यासाठी जात होते. बोरिवली फाटक येथील एक एटीएम बंद असल्याने दुसऱ्या एटीएममध्ये जात होते. बोरिवली रेल्वे फाटक पादचारी पुलावरून जात असताना एकजण तक्रारदार यांच्याकडे आला. त्याने मी आपणास ओळखतो अशा भूलथापा मारल्या. तेव्हा तक्रारदार याने आपण ओळखत नसल्याचे सांगितले. यानंतर आणखी एक ठग तक्रारदार यांच्याकडे आला. जर तुम्ही एक मला एक हजार रुपये दिल्यास आम्ही पैसे दुप्पट देऊ असे सांगितले. पैसे दुपटीच्या लालचीने तक्रारदार याने ठगांना 21 हजार रुपये काढून दिले. पैसे दिल्यानंतर ते दोन ठग भांडणाचा बहाणा करून पळून गेले. तक्रारदार यानेदेखील काही अंतर त्या दोघांचा पाठलाग केला. ते दोघे रिक्षा पकडून पळून गेले. फसवणूक झाल्याने तक्रारदार याने कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.



























































