बोरिवलीत एसटी आगाराच्या जागेवर होणार कमर्शिअल कॉम्प्लेक्स, पुनर्विकास करण्यासाठी महामंडळाने मागवल्या निविदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

असुविधांचे आगार बनलेल्या एसटी महामंडळाच्या राज्यातील आगारांचा आणि बस स्थानकांचा आता चेहरामोहरा बदलणार आहे. बोरिवलीच्या नॅन्सी कॉलनीत असलेल्या बस स्थानकाच्या जागेवर बीओटी तत्त्वावर बस स्थानकाबरोबरच कमर्शिअल कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी महामंडळाने आज निविदा काढल्या आहेत. याचप्रमाणे टप्प्याटप्प्याने राज्यातील प्रमुख 20 आगारांचा आणि बस स्थानकांचा बीओटी तत्त्वावर पुनर्विकास करण्याची एसटीची योजना आहे.

महामंडळाच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागेचा बीओटी तत्त्वावर पुनर्विकास करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असून त्याची सुरुवात बोरिवलीच्या स्थानकापासून होणार असून येथे मोठी व्यावसायिक इमारत उभारण्यात येणार आहे.

सोळा मजल्यांची भव्य इमारत
बोरिवली स्थानकाच्या जागेवर सोळा मजल्यांची भव्य इमारत उभारली जाणार आहे. त्यापैकी तळमजल्यावर पंधरा फलाटांचे बस स्थानक असणार आहे.
पहिल्या मजल्यावर एसटीचे कार्यालय तर दुसऱया आणि तिसऱया मजल्यावर एसटीची वाणिज्य आस्थापना असणार आहे.
चौथा ते तेरावा मजला विकासकाच्या ताब्यात असणार आहे.
या पुनर्विकास प्रकल्पासाठी एसटी महामंडळाला कोणताही निधी खर्च करावा लागणार नसून 30 वर्षांनंतर संपूर्ण इमारत एसटीच्या ताब्यात मिळणार आहे.