
>> बाबासाहेब गायकवाड, नाशिक
कोरोनामुळे आर्थिक संकटात आल्याचे कारण पुढे करून वाहन उद्योगाशी संबंधित नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील आघाडीची कंपनी बॉश (मायको)मध्ये कामगारांच्या स्वेच्छानिवृत्तीसाठी व्यवस्थापनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. टेक्निकल हेड अनंत रमण यांच्याकडून कामगारांचे ब्रेनवॉश केले जात आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
डिझेल वाहनांच्या इंजिनमध्ये वापरल्या जाणार्या इंजेक्टरचे उत्पादन बॉशमध्ये केले जाते. नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत या कंपनीच्या प्रकल्पाला मागील वर्षीच पन्नास वर्षे पूर्ण झालेले आहेत. कामगारांची अंतर्गत युनियन असून, सर्व महत्त्वाचे अंतिम निर्णय हे जर्मनीतील संचालक मंडळच घेते. कायमस्वरूपी बाराशेअकरापैकी सुमारे ऐंशी टक्के कामगार पन्नास-बावन्न वर्षे वयाचे आहेत. त्याशिवाय मागील महिन्यात दोनशेतीस कामगारांना कायम करण्यात आले आहे. अशा एकूण चौदाशे एक्केचाळीस पैकी किमान साडेपाचशे कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती घ्यावी, अशी कंपनी व्यवस्थापनाची अपेक्षा आहे. याबाबत युनियन पदाधिकार्यांशी व्यवस्थापनाने प्राथमिक चर्चा केली आहे. निवृत्तीच्या कालावधीपर्यंतचे ग्रॉस पेमेंट द्यावे, निवृत्तीच्या तारखेपर्यंतचा मेडिक्लेम, टर्म इन्शूरन्स मिळावा, बक्षीस व मोटिव्हेशन म्हणून स्वतंत्र रक्कम द्यावी, स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कामगारांच्या मुलांना नोकरीत प्राधान्य द्यावे आदी मागण्या युनियनने केल्या आहेत.
स्वेच्छानिवृत्तीवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, व्यवस्थापनानेही त्याबाबतची योजना अधिकृत जाहीर केली नाही, असे युनियनच्या काही पदाधिकार्यांनी सांगितले. या हालचाली व्यवस्थापन आणि युनियन यांच्यापुरत्याच मर्यादीत राहिलेल्या नाहीत, तर सातपूर प्रकल्पाचे टेक्निकल हेड अनंत रमण हे सातत्याने पन्नास-शंभर कामगारांची बैठक घेत आहेत. कंपनीची सद्यस्थिती, कोरोनाचे संकट, उत्पादन मागणीतील घट आणि उत्पादनाची वाढती किंमत यामुळे कंपनी कशी आर्थिक संकटात आहे आणि हे संकट अधिक वाढत कसे जाणार आहे, याबाबतची माहिती देतात. कंपनीच्या हितासाठी उत्पादन खर्च कमी करणे आवश्यक असून, त्यासाठी कामगारांची स्वेच्छानिवृत्ती हाच पर्याय असल्याचे सांगून कामगारांचा ब्रेनवॉश करीत आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली असून, व्यवस्थापन कोणती स्वेच्छानिवृत्ती योजना कधी जाहीर करील, याबाबत कामगारांमध्ये उलटसूलट चर्चा सुरू आहे.


























































