कोरोनाच्या ‘बोत्सवाना व्हेरिएंट’ने धडधड वाढवली, जगभरात खळबळ! जाणून घ्या सविस्तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तिसऱ्या लाटेच्या धोक्याने हिंदुस्थानची धडधड वाढली असतानाच कोरोनाचा नवीन घातक व्हेरिएंट काही देशांमध्ये हातपाय पसरू लागला आहे. अत्यंत जास्त प्रमाणात उत्परिवर्तन असलेला हा व्हेरिएंट प्रतिकारकशक्तीवरही आघात करतो आहे. त्यामुळे कोरोनाच्या आणखी लाटा धडकण्याची भीती आहे.

कोणत्या व्हेरिएंटमुळे उडाली खळबळ?

सध्या दक्षिण आफ्रिकेसह तीन देशांमध्ये ‘बोत्सवाना व्हेरिएंट’ आढळला आहे. या तीन देशांमध्ये ‘बोत्सवाना व्हेरिएंट’चे केवळ 10 रुग्ण आढळले आहेत. मात्र ‘स्पाइक प्रोटीन’मध्ये बी.1.1.529 व्हेरिएंटचे 32 उत्परिवर्तन आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञांमध्ये गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली असून अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेतून होणारी विमान उड्डाणे रद्द केली आहेत.

नव्या व्हेरिएंटला ‘बोत्सवाना व्हेरिएंट’ का म्हटले जात आहे?

जागतिक आरोग्य संघटनेनेच्या मते कोणत्याही देशाच्या नावावरुन विषाणूचे नाव ठेवण्याची अधिकृत संमती नाहीय. परंतु ज्या देशामध्ये नवा व्हेरिएंट मिळतो त्या देशाच्या नावावरून त्याला ओळखले जाते. सध्या दक्षिण आफ्रिकेसह तीन देशामध्ये हा नवीन व्हेरिएंट सापडला आहे. बोत्सवानामध्ये बी.1.1.529 व्हेरिएंटचे 32 रुग्ण सापडल्याने यास ‘बोत्सवाना व्हेरिएंट’ म्हटले जात आहे.

सध्या किती रुग्ण सापडले?

जगभरात ‘बोत्सवाना व्हेरिएंट’चे आतापर्यंत 100 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. याचे सर्वाधिक रुग्ण दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडले आहेत. यासह बोत्सवाना आणि हाँगकाँगमध्ये दोन, तसेच इस्त्रायलमध्ये एक रुग्ण आढळला आहे. हा व्हेरिएंट वेगाने पसरून हाहाकार उडवू शकतो यामुळे जगभरातील शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

किती धोकादायक आहे हा व्हेरिएंट?

जगभरातील शास्त्रज्ञांनी ‘बोत्सवाना व्हेरिएंट’ अधिक धोकादायक असल्याचे म्हटले आहे. हा व्हेरिएंट वेगाने पसरण्याचा धोका आहे. लंडन येथील इम्पिरिअर कॉलेजचे व्हायरस एक्सपर्ट डॉ. टॉम पिकॉक यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या ट्विटर अकाउंटवरून याचा व्हेरिएंटबाबत माहिती दिली होती. अन्य कोणत्याही व्हेरिएंटपेक्षा हा अधिक घातक असल्याचे त्यांनी म्हटले होते.

का आहे हा अधिक धोकादायक?

B. 1.1.529 या प्रकारात 50 हून अधिक उत्परिवर्तन (म्युटेशन) सापडले आहेत, त्यापैकी 32 उत्परिवर्तन त्याच्या स्पाइक प्रोटीनमध्ये आहेत. शरीरातील पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी विषाणू स्पाइक प्रोटीनची मदत घेतो. याव्यतिरिक्त, व्हेरिएंटच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनमध्ये 10 उत्परिवर्तन झाले. डेल्टा व्हेरियंटमध्ये असे फक्त दोन उत्परिवर्तन होते. जेव्हा डेल्टा व्हेरियंटने स्पाइक प्रोटीनमध्ये K417N उत्परिवर्तन केले तेव्हा डेल्टा प्लस प्रकाराचा जन्म झाला. या वेरिएंटने शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीची मोठ्या प्रमाणावर हानी केली होती. त्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या वाढली.

लस घेतलेल्यांना किती धोका?

जगभरात विकसित झालेल्या बहुतेक कोविड लसींचा हल्ला फक्त स्पाइक प्रोटीनवर होतो. बोत्सवाना प्रकारात स्पाइक प्रोटीनमध्ये 32 उत्परिवर्तन असल्याने, लशीला प्रभावहीन करण्यास हा व्हेरिएंट सक्षम आहे. हाँगकाँगच्या दोन्ही रुग्णांनी फायझर लसीचा डोस घेतला होता, तरीही त्यांना संसर्ग झाला. त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञ अलर्ट झाले आहेत.

नवा व्हेरिएंट हवेतून पसरतो का?

हाँगकाँगच्या दोन्ही रुग्णांनी फायझर लसीचा डोस घेतला होता, परंतु ते नुकतेच आफ्रिकेहून परतले होते. त्यांच्या नमुन्यांच्या तपासणीत विषाणूचे प्रमाण खूप जास्त आढळून आले. त्यामुळेच नवीन प्रकार हवेतून पसरत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने तातडीची बैठक बोलावली आहे.