
मुलगी नको म्हणून स्त्रीभ्रृणहत्या, मुलगी झाली की तिला कचरा कुंडीत टाकणे, मुलीची हत्या करणे अशा गंभीर घटना आतापर्यंत घडल्या आहेत. मात्र मुलगी हवी म्हणून एका दांपत्याने स्वतःच्या नवजात मुलाला कचराकुंडीत फेकल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील सुरत शहरात घडली आहे. या प्रकरणी नवजात मुलाच्या आईवडिलांना अटक करण्यात आली आहे.
सुरतमधील चौक बाजारजवळील सिंगणपोर परिसरातील झाडांमध्ये लहान बाळाचा रडण्याचा आवाज आल्यामुळे नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यावेळी त्यांना झुडपांमध्ये नवजात बालक दिसले. नवजात बाळ मुलगा असल्याचे पाहून पोलीसांना धक्का बसला.
नवजात बाळाला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या घटनेची तक्रार दाखल केली असून नवजात बालकाच्या आई वडीलांचा शोधाला सुरुवात केली. तपासानंतर पोलीस ट्रक चालक मंगूभाई बंजारा आणि त्याची पत्नी गंगाबेन यांच्यापर्यंत पोहचले. पोलिसांच्या चौकशीत नवजात बाळ आपले असल्याचे त्यांनी कबूल केले. पोलिसांनी घटनेबद्दल विचारल्यावर त्यांनी सांगितले की, त्यांना तीन मुले आहेत. आपल्याला आता मुलगी हवी होती. मात्र, पुन्हा मुलगा झाला. त्यामुळे निराश झाल्याने मुलाला कचराकुंडीत फेकल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी मंगूभाई बंजारा आणि त्याची पत्नी गंगाबेन या दोघांनाही अटक केली आहे.


























































