
कोरोना हा फुप्फुसाशी संबंधित असणारा आजार आता मेंदूवरही आघात करू लागला आहे. एका 48 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीला या आजारासह मेंदूचा झटका( ब्रेन स्ट्रोक) आल्याचे समोर आले आहे. या स्ट्रोकमुळे रूग्णाच्या बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला होता. मात्र, मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ड रूग्णालयाने स्पीच थेरपीद्वारे यशस्वी उपचार केले. हा रूग्ण कोरोनातून बरा होऊन आता सर्वसामान्य आयुष्य जगू लागला आहे.
तिरूपती स्वामी (48) असे रूग्णाचे नाव असून ते उल्हासनगरमधील रहिवासी आहेत. वोक्हार्ट रूग्णालयातील सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रशांत मखीजा म्हणाले की, ‘‘या रूग्णाला कोरोनाची लागण झाली होती. त्यातच मेंदूचा झटका आल्याने त्यांना बोलता येत नव्हते. अशा परिस्थितीत त्यांच्यावर मेलोडिक इनटोनेशन थेरपी (एमआयटी) द्वारे उपचार करण्याचा निर्णय घेतला. ही थेरपी शब्द व अर्थपूर्ण भाषा सुधारण्यास मदत करते.’’ रूग्णालयातील स्पीच थेरपिस्ट नूतन कोरगावकर यांनी स्वामी यांच्यावर उपचार केले.



























































