
हिंदुस्थानी वायुसेनेने बंगालच्या उपसागरात उडवलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. 400 किमी अंतरापर्यंतच्या लक्ष्यांवर अचूक निशाणा साधू शकते. या क्षेपणास्त्राची चाचणी सुखोई एसयू-30 लढाऊ विमानातून करण्यात आली आहे, असे हवाई दलाने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. संरक्षण विभागाने सांगितले की, चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राने जहाजाच्या मधोमध निशाणा साधला. क्षेपणास्त्राच्या हवेतून प्रक्षेपित केलेल्या एयर-लॉन्च व्हर्जनचे हे अॅन्टी-शिप व्हर्जन आहे.
ब्रह्मोससोबतच सुखोईच्या क्षमतेचीही चाचणी घेण्यात आली. हे लढाऊ विमान हवाई दलासह नौदलाचे बलस्थान बनले आहे.
हिंदुस्थानी नौदल आपल्या युद्धनौकेपासून 400 किमी अंतरापर्यंत शत्रूची जहाजे नष्ट करू शकणार आहे. या युद्धनौकेतून सुखोई हे क्षेपणास्त्र घेऊन उड्डाण करेल आणि शत्रूच्या जहाजाला सहज लक्ष्य करेल.
लष्करी ताकद वाढली
या क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे हवाई दलाने जमीन आणि समुद्रातील लक्ष्यांना दूरवरून लक्ष्य करण्याची किमया साधली आहे. कधी युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर सुखोई आणि हे क्षेपणास्त्र हिंदुस्थानी हवाई दलाच्या योजना मजबूत करेल. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, ही चाचणी वायुसेना, नौदल, डीआरडीओ, बीएपीएल आणि एचएएलने एकत्रित आयोजित केली. या वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला हिंदुस्थानने Su-30 MKI लढाऊ विमानातून ब्रह्मोस हवेतून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. सुखोईवरून ब्रह्मोस क्षेपणास्त्राची ही पहिली चाचणी होती.
सामर्थ्य वाढले
ब्रह्मोसची सुरुवातीची रेंज 290 किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांवर मारा करणार होती. जे आधी 350 किमीपर्यंत वाढली आणि आता गुरुवारी चाचणीनंतर 400 किमी अंतरापर्यंतचे लक्ष्य गाठण्यात यश आले.
ब्रह्मोस हे नाव कसे पडले?
ब्रह्मोस हिंदुस्थानच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि रशियाच्या फेडरल स्टेट युनिटरी एंटरप्राइझ NPOM यांच्यातील संयुक्त करारांतर्गत विकसित केले गेले आहे. ब्रह्मोस हे मध्यम श्रेणीचे स्टेल्थ रामजेट सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र जहाज, पाणबुडी, विमान किंवा जमिनीवरून डागता येते.
संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रह्मोस हे नाव ब्रह्मदेवाच्या शक्तिशाली ब्रह्मास्त्र या शस्त्राच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. मात्र, काही रिपोर्ट्समध्ये हिंदुस्थानच्या ब्रह्मपुत्रा आणि रशियाची मॉस्क्वा नदी या दोन नद्यांच्या नावावरून या क्षेपणास्त्राला नाव देण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. हे जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्र म्हणून जगातील सर्वात वेगवान असल्याचे मानले जाते.
ब्रह्मोस क्षेपणास्त्र किती खतरनाक आहे?
हिंदुस्थानकडे रशियाच्या सहकार्याने तयार केलेले प्रगत सुपरसॉनिक ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ते 400 किमी अंतरावरील आपले लक्ष्य गाठण्यास सक्षम आहे. याशिवाय हिंदुस्थान हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोस-2 वरदेखील काम करत आहे जे 2024 पर्यंत तयार होऊ शकते. त्याची क्षमता एक हजार किलोमीटरपर्यंत असू शकते. ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचेही चार प्रकार आहेत. यामध्ये पृष्ठभागावरून पृष्ठभाग, आकाशातून पृष्ठभाग, समुद्रातून पृष्ठभाग आणि समुद्राच्या आत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. ब्रह्मोस हे जगातील सर्वात वेगवान क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. ते जमिनीपासून कमी उंचीवर खूप वेगाने उडते, त्यामुळे क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणेने त्याला पकडणे सोपे नसते. यामुळेच या क्षेपणास्त्रात कमी वेळेत लांब पल्ल्यापर्यंत अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. पाकिस्तानकडे बाबर आणि राड नावाची सबसॉनिक क्षेपणास्त्रे आहेत जी जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहेत.
किती प्रकारची असतात क्षेपणास्त्रे?
क्षेपणास्त्रांचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक क्रूझ क्षेपणास्त्र आणि दुसरे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र.
क्रूझ क्षेपणास्त्र
क्रूझ क्षेपणास्त्र हे एक मानवरहित स्वयंचलित वाहन आहे जे एअरोडायनॅमिक लिफ्टद्वारे उड्डाण घेते. लक्ष्यावर स्फोटके किंवा विशेष पेलोड टाकणे हे त्याचे काम आहे. ते जेट इंजिनच्या मदतीने पृथ्वीच्या वातावरणात उड्डाण करते. त्याची गती अतिशय वेगवान असते. क्रूझ क्षेपणास्त्रांचे तीन प्रकार आहेत. या अंतर्गत सबसॉनिक, सुपरसॉनिक आणि हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे आहेत. सबसॉनिक म्हणजे ज्याचा वेग आवाजापेक्षा कमी आहे. दुसरा सुपरसॉनिक जो आवाजापेक्षा तिप्पट वेगाने जातो. तिसरा हायपरसोनिक ज्याचा वेग आवाजापेक्षा 5 पट जास्त आहे
बॅलेस्टिक क्षेपणास्त्र
बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हे एक असे क्षेपणास्त्र आहे जे त्याच्या जागी सोडल्यानंतर वेगाने वर जाते आणि नंतर गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने खाली येऊन आपल्या लक्ष्यावर आदळते. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे मोठ्या सागरी जहाजातून किंवा संसाधनांनी युक्त विशिष्ट ठिकाणाहून सोडली जातात. पृथ्वी, अग्नी आणि धनुष ही हिंदुस्थानची क्षेपणास्त्रे आहेत.
हिंदुस्थानचे क्षेपणास्त्र पाकिस्तानात पडले
9 मार्च रोजी ते चन्नू मियाँ शहराजवळ पाकिस्तानमध्ये 124 किमी अंतरावर पडले. तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचे हिंदुस्थानचे म्हणणे आहे. दुसरीकडे, हे शस्त्रास्त्रांशिवाय सुपरसॉनिक क्षेपणास्त्र असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तीकर यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, मियां चन्नू शहराजवळ एक हाय-स्पीड फ्लाइंग ऑब्जेक्ट क्रॅश झाला. 40 हजार फूट उंचीवर आणि मॅच 3 वेगाने पाकिस्तानी हवाई हद्दीत 124 किलोमीटर अंतरावर उड्डाण केल्यानंतर ही वस्तू कोसळली.

























































